आज कांदे नवमीनिमित्त का केला जातो कांदे भजीचा बेत? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि विज्ञान!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 09:35 AM2024-07-15T09:35:35+5:302024-07-15T09:36:03+5:30
चातुर्मास सुरू होण्याआधी येणारी आषाढातली नवमी कांदे नवमी म्हणून साजरी केली जाते, पण आजच का? वाचा कारण!
आज आषाढ शुद्ध नवमी, आजची तिथी कांदेनवमी म्हणून ओळखली जाते. कारण इथून पुढे म्हणजेच आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास सुरू होणार असतो. या महिन्यात कांदा लसूण वर्ज्य केले जाते. म्हणून चातुर्मासाआधी ते संपवण्याची केलेली तजवीज म्हणजे कांदेनवमी.
धार्मिक कार्यात, देवाला नैवेद्य दाखवताना कांदा, लसूण असलेले पदार्थ देवाला अर्पण करत नाहीत. चातुर्मासात दरदिवशी काही ना काही व्रत वैकल्ये असतात. त्यात यंदा अधिक श्रावण मास, म्हणजे श्रावणाच्या आधी अधिक महिना येतोय. तो महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे त्या काळात तर अजिबातच कांदा, लसूण वापरत नाहीत आणि जोडून येणाऱ्या श्रवणातला तर प्रत्येक दिवस महत्त्वाचा! अशा वेळी घरात कांदे भरून ठेवले तर पावसाळी वातावरणात ते कुजून जातील आणि घरात दुर्गंध पसरेल, म्हणून पूर्वीचे लोक नवमीच्या तिथीला घरातील कांदा लसूण संपवून टाकत असत.
धार्मिक कार्यात, देवाला नैवेद्य दाखवताना कांदा, लसूण असलेले पदार्थ देवाला अर्पण करत नाहीत. ते पावित्र्य जपले जाते. पलाण्डुभक्षणं पुनरुपनयम् ही शास्त्रोक्ती बऱ्याच वेळा कानावर येते. म्हणजे कांदा भक्षण केल्यावर पुन्हा मुंज करावी असे धर्मशास्त्र सांगते. यातच धर्मशास्त्राने कांदा सेवनाला केलेला निषेध लक्षात येतो.
कांदा सोलत गेल्यास शेवटी आत राहणारा कोंब हा मनोव्यापार चाळवणारा आहे. म्हणून कांद्याला कंदर्प म्हणजे मदन म्हटले आहे. कांद्याचे सेवन केल्यास त्याचा परिणाम रक्तात असेपर्यंत कामवासनात्मक विचार मनात थैमान घालतात. कांदा खाल्यावर काही वेळाने वीर्याची घनता कमी होते व गतीमानता वाढते. परिणामी विषयवासना वाढते. शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्यास अपचन, अजीर्णसारखे उदरविकार संभवतात. इतके असूनही आयुर्वेदाने कांदा व लसूण यांचा समावेश औषधी वनस्पतीत केला आहे. हृदयरोग असल्यास लसूण उपकारक ठरतो.
मात्र सद्यस्थितीत म्हणाल, तर कांदा-लसणाशिवाय आपले पान हलत नाही. चमचमीत पदार्थ करायचे झाले की त्यांची उपस्थिती प्रार्थनीय असते. जिभेचे चोचले पुरवायचे म्हणजे त्यांना शरण जाणे ओघाने आलेच. त्यामुळे कांदेनवमीला कांदे भजीचा फडशा पाडून परत कांदा लसूण खाणारे लोक आहेच. अशावेळी किमान सणवारी पथ्य पाळावे असा नेम आपण नक्कीच करू शकतो. आपल्या सणांचे पावित्र्य आपण जपले नाही तर पुढच्या पिढीला कोण या गोष्टींचे महत्त्व सांगणार?
त्यामुळे आपणही काही पथ्य, नियम स्वतःला लावून घेऊया, आपल्या धर्मसंस्कृतीचे पालन करूया आणि कांदेनवमी मजेत साजरी करूया!