वास्तूच्या प्रवेशद्वारावर 'या' शुभ चिन्हांचे रेखाटन महत्त्वाचे का मानले गेले आहे? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 04:57 PM2022-02-24T16:57:39+5:302022-02-24T16:58:19+5:30
हिंदू धर्मातील प्रतीके ही ईश्वरी अंशाच्या खुणा मानल्या जातात. त्या देवतांना आवाहन करून त्यांचा वास आपल्या वास्तूत राहावा यासाठी पुढील चिन्हे रेखाटली जातात.
हिंदू धर्मात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या मानवाच्या प्रगतीत भर घालतात. त्यापैकी एक आहे - शुभ चिन्ह! बहुतेक घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर शुभ चिन्हे रेखाटली जातात. शुभ, लाभ आणि स्वस्तिक आणि गृहलक्ष्मीच्या हाताचा ठसा ही चिन्हे घराच्या, मंदिराच्या किंवा व्यावसायिक वास्तूच्या मुख्य दरवाजांवर का रेखाटली जातात? ते जाणून घ्या.
हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की घराच्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहिल्याने आणि स्वस्तिक चिन्ह लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. यासोबतच श्री हे रेखाटन श्रीगणेशाचे अस्तित्त्व निर्माण करते. त्यामुळे बाप्पाचाही आशीर्वाद प्राप्त होतो. याशिवाय ही चिन्हे वास्तुबाहेरील नकारात्मक ऊर्जा वास्तुबाहेर रोखून धरतात. हिंदू धर्मातील प्रतीके ही ईश्वरी अंशाच्या खुणा मानल्या जातात. त्या देवतांना आवाहन करून त्यांचा वास आपल्या वास्तूत राहावा यासाठी शुभ लाभ लिहिले जाते. तसेच मांगल्याचे प्रतीक म्हणून स्वस्तिक, ओंकार किंवा गृहलक्ष्मीच्या हाताचे ठसे उमटवले जातात.
शास्त्रात श्रीगणेशाचा पुत्र शुभ लाभ मानला आहे. अशा स्थितीत शुभ लिहिणे म्हणजे ज्या साधनाने आपल्याला संपत्ती आणि कीर्ती प्राप्त झाली आहे, तिचे उगमस्थान सदैव वास्तूत राहावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करणे. तसेच शुभ लिहिणे म्हणजे आपण देवाकडे प्रार्थना करतो की घरातील संपत्ती नेहमी शुभ मार्गे वाढू दे. त्याचबरोबर व्यवसायातही आर्थिक प्रगती होऊ दे.
घराच्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहिल्याने घरात सुख-शांती कायम राहते. या शब्दांमध्ये सकारात्मकता ठासून भरलेली आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दारातच नष्ट होऊन घर, वास्तू सुरक्षित राहते. हे शब्द कुंकवाने लिहिण्यामागचे कारण म्हणजे कुंकू हे माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे तिचा वास घरात सदैव राहावा आणि तिचा वरदहस्त कायम राहावा अशी भावना असते.