शाळीग्राम शिळेतून घडवलेल्या मूर्तीला एवढे महत्त्व का? त्याचे उपप्रकार कोणते? सविस्तर जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 03:21 PM2023-02-04T15:21:25+5:302023-02-04T15:21:42+5:30
अनेकांच्या देवघरात शाळीग्राम असतो, अयोध्येतही शाळीग्रामाची मूर्ती साकार होणार आहे, या विशेष शिळेबद्दल अधिक जाणून घेऊ.
>> योगेश काटे, नांदेड
नेपाळमधून पवित्र शाळिग्राम शिळा अयोध्येत पोहोचल्या या पवित्र शाळिग्राम शिळेपासू प्रभु श्रीराम व सीतामय्या यांची मूर्ती (विग्रह) तयार होणार आहेत.
अशा पवित्र शाळिग्रामची माहीती जाणून घेऊया.
शाळिग्राम :
शाळिग्रामात लक्ष्मीसमेत श्री विष्णूचे नित्य सानिध्य असते. शाळिग्रामाची नित्यपुजन व तुलसीअर्चन आणि नैवद्य करणे हा शास्त्राचा दंडक. तुळशी शिवाय शालिग्रामची पुजाच करू नये एकवेळस फुल नसले तरी चालेल मात्र तुळस आवश्यक आहे. तुळशिवाय शाळिग्रामची पुजा केल्याने दारिद्रय येते असा गुरुचरित्रात उल्लेख मिळतो. श्री नरसिंह सरस्वती यांच्या नित्य पुजनात शाळिग्राम होते.
शाळिग्राम पुजाचा आचार सोवळ्यातच आहे. पद्मपुराणात शालिग्रामची कथा आहे. तसेच वृंदा जालंदर व विष्णुची कथा आहे. भविष्योत्तरपुराणात शाळिग्राम नामक एक स्तोत्र आहे धर्मराज युधिष्ठिर व भगवान श्रीकृष्णाचा हा संवाद यात विविध शाळिग्रामाची वर्णनने आहेत तसेच दशावताराचे वर्णन मिळेल. खुप सुंदर असे स्तोत्र आहे.
पंचायतन पुजा विशेषतः मध्व संप्रदायात शाळिग्रामाचे महत्तव अधिक. शाळिग्रामावरील मुखे व चक्रे यांवरून त्याची परीक्षा करतात. शाळिग्रामाचे एकुण ८९ प्रकार असून रंगावरून पुढील नावे दिली आहेत :
शुभ्र पांढरा –वासुदेव,
निळा–हिरण्यगर्भ,
काळा –विष्णू,
गडद हिरवा–श्रीनारायण,
तांबडा –प्रद्युम्न
गडद निळा – नरसिंह किंवा वामन.
शाळीग्राम एक प्रकारचा जीवाश्म दगड आहे, जो देवाचा प्रतिनिधी म्हणून देवाला आवाहन करण्यासाठी वापरला जातो.शालिग्राम सहसा पवित्र नदीच्या काठावरुन किंवा काठावरुन गोळा केला जातो. शिवभक्त पूजा करण्यासाठी शिवलिंगाच्या रूपात जवळजवळ गोलाकार किंवा अंडाकृती शालिग्राम वापरतात. वैष्णव (हिंदू) विष्णूचा प्रतिनिधी म्हणून पवित्र गंडकी नदीत सापडलेल्या गोलाकार शिळेला शाळीग्राम म्हणतात. शालिग्राम हे विष्णूचे एक नाव आहे.
पद्मपुराणानुसार - गंडकी अर्थात नारायणी नदीच्या प्रदेशात शालिग्राम स्थळ नावाचे एक महत्त्वाचे स्थान आहे; तिथून बाहेर पडणाऱ्या दगडाला शाळीग्राम म्हणतात. शालिग्राम शिळेच्या नुसत्या स्पर्शाने करोडो जन्मांची पापे नष्ट होतात, असे म्हणतात.
बारा चक्रे असलेल्या शाळिग्रामाला अनंत म्हणतात. शाळिग्रामाच्यातीर्थाचे फार महत्व आहे. शाळिग्राम स्तोत्रातील हा श्लोक फार प्रसिद्ध .
अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम् ।
विष्णोः पादोदकं पीत्वा शिरसा धारयाम्यहम् ।।
नित्य श्रीहरीचे सानिध्य शाळिग्राम शिलेत वास करतो अशी आपल्या धर्मशास्त्राची व सश्रद्ध व धार्मिक हिंदुंची धारणा आहे.