Shani Dev: घरात शनीदेवाची मूर्ती का ठेवली जात नाही? पाहा, कारण, नियम आणि पूजनाची योग्य पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 11:15 AM2022-03-03T11:15:01+5:302022-03-03T11:15:14+5:30
Shani Dev: शनीदेवाचे शुभाशिर्वाद लाभण्यासाठी नेमके काय करावे? जाणून घ्या...
भारतीय प्राचीन परंपरा आणि संस्कृतीमध्ये ३३ कोटी देव असल्याची मान्यता आहे. दररोज कोट्यवधी घरांमध्ये आपापले कुळाचार, कुळधर्म यांप्रमाणे घरातील देवतांचे पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना, भजन, जप केले जातात. कुलदेवता, आराध्य देवतांना देवघरात स्थापन केले जाते. यामध्ये अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पापासून हनुमंतांपर्यंत अनेकविध देवतांची नावे घेता येतील. मात्र, या सगळ्यांमध्ये काही देवता अशा आहेत, ज्यांचे पूजन केले जाते. मात्र, त्यांना देवघरात स्थान दिले जात नाही.
नवग्रहांमधील न्यायाधीश मानला जाणारा शनीदेव हा यापैकी एक आहे. सूर्यपुत्र मानला गेलेल्या शनीला अन्य देवतांप्रमाणे पूजले जाते. शनीची अनेक स्तोत्र, मंत्र, श्लोक असून, याचे पठण, नामस्मरण, जप केले जातात. शनीच्या प्रतिकूल प्रभावापासून बचाव होण्यासाठी भाविक शनीची उपासना करत असल्याचे पाहायला मिळते. विशेष करून शनीची साडेसाती, ढिय्या प्रभाव तसेच महादशा सुरू असलेल्यांना शनी पूजन, नामस्मरण, उपासना करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, शनीदेवाची मूर्ती, तसबीर, प्रतिमा शक्यतो घरात स्थापन केली जात नाही.
घरात शनीदेवाची मूर्ती किंवा फोटो ठेवला जात नाही
पौराणिक मान्यतांनुसार, शनीदेवाला शाप मिळाला होता की, ते ज्या कोणाकडे पाहतील त्याचा नाश होईल. यामुळेच कोणत्याही घरात शनिदेवाची मूर्ती किंवा फोटो ठेवला जात नाही. जेणेकरून लोक त्यांच्या नजरेपासून दूर राहतील. इतकेच नाही तर, शनीदेवाची पूजा करताना कधीही त्यांच्या मूर्तीसमोर उभे राहून पूजा करू नये. तर, शनिदेवाचे दर्शन नेहमी मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभे राहून घ्यावे.
पाषाणरूपाचे दर्शन घ्यावे
शनीदेवाच्या दृष्टीपासून वाचण्यासाठी शनिदेवाच्या मूर्तीऐवजी त्यांच्या पाषाणरूपाचे दर्शन घ्यावे. याशिवाय पिंपळाच्या झाडाची पूजा करणे, मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे किंवा शनिदेवाला दान करणे हे देखील शनिदेवाची कृपा मिळवण्याचा उत्तम उपाय आहे. गरीब, असहाय्य लोकांना मदत करून त्यांची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.