सेवेत तत्पर असणाऱ्या हनुमंताचे सुप्त अवस्थेत मंदिर काही ठिकाणी का आढळते ? कारण महाभारतात आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 11:58 AM2023-05-05T11:58:27+5:302023-05-05T11:59:09+5:30

हनुमंत नेहमी राम कार्यासाठी तत्पर असतात, मग निद्रा अवस्थेतील मंदिर उभारण्याचे कारण जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे ठरते!

Why is the temple of sleeping Hanumanta found in some places? The reason is in the Mahabharata! | सेवेत तत्पर असणाऱ्या हनुमंताचे सुप्त अवस्थेत मंदिर काही ठिकाणी का आढळते ? कारण महाभारतात आहे!

सेवेत तत्पर असणाऱ्या हनुमंताचे सुप्त अवस्थेत मंदिर काही ठिकाणी का आढळते ? कारण महाभारतात आहे!

googlenewsNext

काही प्रचलित समजुतींमागचे कारण जाणून न घेताही आपण पालन करतो, त्यामागे सद्हेतू असणार हा भाव ठेवून आपण त्या करतो. जसे की रात्री केस कापू नये, नखे कापू नये, केर काढू नये, झाडांना हात लावू नये इ. त्यामागे निश्चितच काही ना काही कारणे आहेत, परंतु ती जाणून न घेता केवळ अंधानुकरण करणे योग्य नाही. एखाद्या कृतीमागे असलेला हेतू कळला तर ज्ञानात तर भर पडतेच शिवाय आपण जे करतो, वागतो ते समजून उमजून केल्याने आनंद दुणावतो. अशाच कृतींपैकी एक म्हणजे झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाऊ नये! आता ही केवळ प्रथा आहे की त्यामागे काही कारण, चला जाणून घेऊ. 

काही गोष्टींचा संबंध थेट पौराणिक कथांशी जोडला जातो. ते विचार तर्क सुसंगत असतील तर पटतातही. काही पौराणिक कथा या रूपकात्मक असल्याने त्यातून मनुष्याने बोध घ्यावा हा हेतू असतो. झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाऊ नये हे सांगण्यामागे महाभारताच्या कथेशी संबंध जोडण्यात आला आहे. ती कथा आणि त्याच्याशी संबंधित तर्क पडताळून पाहू. 

महाभारतात काय सांगितले आहे?

महाभारताच्या कथेनुसार, भीमाचे गर्वहरण करण्यासाठी श्रीकृष्णाने हनुमंताला आज्ञा दिली. हनुमंतांनी वृद्ध वानराचे रूप घेऊन आपल्या भल्या मोठ्या शेपटीने भीमाचा मार्ग अडवला. आपले शरीर थकल्याने आपल्याला हलताडुलता येत नाही, त्यामुळे तूच मदत कर असे हनुमंतांनी भीमाला सांगितले. भीमाची वाट अडवल्याने त्याला वृद्ध वानराचा राग आला आणि तो त्यांना ओलांडून जाऊ लागला. पण काही केल्या त्याला तसे करणे शक्य होईना. हनुमंताने पुन्हा त्याला शेपूट उचलून बाजूला ठेव असे सांगितले. भीमाने तसे केले पण त्याला तेही जमले नाही. तेव्हा हे वानर असाधारण व्यक्तिमत्त्व असल्याचे भीमाला कळून आले आणि त्याचे गर्वहरण झाले. 

भीम त्या वानराला शरण आला आणि हनुमंताने आपले रूप टाकले आणि मूळ रूप प्रगट केले. ते पाहता भीम हनुमंतासमोर नतमस्तक झाला आणि त्याने आपल्या अहंकाराची कबुली दिली. त्यावर हनुमंत म्हणाले, 'भीमा आपण कितीही पराक्रमी असलो तरी समोरच्याला दुबळे समजण्याची चूक करू नये. शिवाय एखाद्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक, वैचारिक रित्या ओलांडून जाणे हा तिचा अपमान आहे हे लक्षात ठेवावे. म्हणून व्यक्ती झोपलेली असली, वयाने लहान असली तरी तिच्याकडूनही आपल्याला शिकण्यासारखे बरेच काही आहे, हे लक्षात घेऊन तिला ओलांडण्याची चूक करू नये!'

हनुमंताचे हे बोलणे ऐकून भीमाने ही खूणगाठ बांधली आणि त्यानंतर तो कधीच कोणाला ओलांडून गेला नाही. त्याने आपला अनुभव आपल्या भावंडाना सांगितला, त्यांनाही बोध झाला आणि त्या विचाराचे अनुकरण लोक करू लागले व ती प्रथा बनत गेली. 

अशा रीतीने ही पौराणिक कथा या रीतीमागची पार्श्वभूमी तर सांगतेच शिवाय त्यामागच्या तर्काचाही खुलासा करते. त्यामुळे यापुढे झोपलेली व्यक्ती पाहिल्यावर तिला ओलांडून तर जाऊ नयेच, शिवाय तिचा आदर का करावा हेही लक्षात ठेवावे! याच गोष्टीचे स्मरण म्हणूनही भारतात अनेक ठिकाणी सुप्तअवस्थेतील हनुमंताच्या मूर्तीचे दर्शन घडते!

यामागे आणखीही अनेक आख्यायिका सांगितल्या जातात,त्यातील एक पुढीलप्रमाणे-

भद्रा मारुती मंदिरात हनुमानाची मूर्ती झोपलेल्या स्थितीत असण्याबद्दल अनेक समजुती आहेत. पण यातील सर्वात प्रसिद्ध राजा राजशी भद्रसेनची कथा आहे. राजा राजशी भद्रसेन तलावाच्या काठी हनुमानाची गाणी म्हणत असे म्हणतात. एके दिवशी हनुमान तेथे प्रकट झाले आणि राजाची गाणी ऐकू लागले. गाणे ऐकत हनुमानाला झोप लागली. तेव्हापासून येथे हनुमानाची मूर्ती पडलेल्या अवस्थेत आहे.

Web Title: Why is the temple of sleeping Hanumanta found in some places? The reason is in the Mahabharata!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.