कलशाचे पूजन हे पंचमहाभूतांचे पूजन का मानले जाते? या प्रतीकात्मक पूजेची सविस्तर माहिती वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 03:01 PM2022-02-10T15:01:59+5:302022-02-10T15:02:20+5:30

कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य मांगलिक चिन्ह असल्यामुळे त्याच्या सान्निध्यात व साक्षीने शुभकार्य घडवतात. प्रत्येक शुभप्रसंगात कार्यारंभी जशी गणरायाची पूजा होते, तसेच कलशाचे पूजन करतात.

Why is worship of Kalasha considered as worship of Panchmahabhuta? Read the details of this symbolic worship! | कलशाचे पूजन हे पंचमहाभूतांचे पूजन का मानले जाते? या प्रतीकात्मक पूजेची सविस्तर माहिती वाचा!

कलशाचे पूजन हे पंचमहाभूतांचे पूजन का मानले जाते? या प्रतीकात्मक पूजेची सविस्तर माहिती वाचा!

googlenewsNext

घरातील मंगलकार्यात गणरायाबरोबर कलश पूजाही केली जाते. तेव्हा कलश स्थापन करताना हमखास होणारा गोंधळ म्हणजे त्यावर नारळ कोणत्या बाजूने ठेवावा. कलशावर श्रीफळ अर्थात नारळ ठेवताना शेंडीचा भाग वर करावा. नारळाला पाणी लागेल, इतके पाणी कलशात घालावे. तसेच कलशात दूध पाणी घालावे. एक नाणे टाकावे, नारळाच्या कडेने आंब्याची, विड्याची पाने लावावीत, नारळावरही हळद कुंकू वहावे. कलशावर हळद कुंकवाने स्वस्तिक काढावे. कलश ठेवण्यापूर्वी खाली तांदूळ वा गहू पसरून त्यावर हळद कुंकू वाहून कलश स्थापित करावा.

कलशपूजेचे महत्त्व :

कलश एक गोलाकार उभट पात्र. कौटुंबिक व सामुहिक शुभकृत्ये व धार्मिक विधीत कलश या वस्तूला अतिशय प्रतिष्ठित स्थान आहे.  विश्वकर्म्याने देवांच्या कलेकलेचे ग्रहण करून निर्माण केल्यामुळे त्याला कलश म्हटले जाते. कलशांची क्षितींद्र, जलसंभव, पवन, अग्नी, यजमान, कोशसंभव, सोम, आदित्य, विजय असे नऊ प्रकार असून विजय कलश पीठाच्या मध्यभागी स्थापन करतात. बाकीचे पूर्व, पश्चिम, वायव्य, आग्नेय, नैऋत्य, उत्तर व दक्षिण अशा क्रमाने अष्टदिशांना स्थापन करतात. 

सुरासूर अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत असता अमृत धारण करण्यासाठी विश्वकर्म्याने याची निर्मिती केली, अशी कलशाच्या उत्पत्तीची कथा आहे. कलशाच्या ठिकानी ब्रह्मा, गळ्याच्या ठिकाणी शंकर आणि मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकागण व दशदिशांना वेष्टून घेणारे दिक्पाल वास्तव्य करतात. त्याच्या पोटात सप्तसागर, सप्तद्वीपे, ग्रहनक्षत्रे, कुलपर्वत, गंगादि सरिता व चार वेद असतात. या सर्व देवतांचे कलशांच्या ठिकाणी स्मरण, ध्यान, चिंतन करावे.

मंगल कार्यात, शांतिकर्मात प्रथम धान्यराशीवर कलश प्रतिष्ठित करतात. पुण्याहवाचनाच्या वेळी दोन कलशांची स्थापना करतात. त्या कलशात सोने, रूपे, पाचू, मोती आणि प्रवाळ ही पंचरत्ने घालतात. दुर्वा व पंचपल्लव यांनी तो सुशोभित करून कोरे वस्त्र वेष्टितात. त्यावर पूर्णपात्रे किंवा श्रीफळ ठेवतात. जसे विधान असेल, तशी कलशांची संख्या एकापासून एकशे आठपर्यंत असते. वरूणदेवाची पूजा कलशावरच करतात. कलशाच्या मुखावर ठेवलेले पुष्पपल्लव हे जीवनसमृद्धीचे प्रतीक मानतात.

हिंदू जीवनपद्धतीप्रमाणेच बौद्ध धर्मातील पुरातन प्रतीकांपैकी कलश हे एक प्रतीक आहे. बौद्ध धर्मात पाच मोठे सच्छिद्र कलश पाच ज्ञानी बुद्धांची प्रतीके म्हणून वेदीवर लिहितात. कलश म्हणजे मानवशरीर व जल म्हणजे त्यातील जीवनसत्त्व आहे.

कलशातील पंचरत्ने ही पंचमहाभूते, पंचेंद्रिये, पंचविषय यांची प्रतीके तर कलशातल्या दुर्वा या सकल जीवसृष्टीच्या मुळ्या समजतात. कलशाची संकल्पना भारतीय शिल्पकलेत ठळकपणे दिसून येते. कमलपुष्पांनी मंदित असलेले नक्षीदार कलश सांची, भरदूत, अमरावती येथील बौद्ध शिल्पात आढळतात. मंदिर आणि लेण्यातले स्तंभ मुख्यत्वे कमल आणि कलश यांच्या सुभग संयोगाने घडविलेले आहेत. मंदिराच्या शिकरावर जो कळस असतो तोदेखील कलशच! खाली कलश व त्यावर उभा नारळ ठेवूनच शिखराचे काम पूर्ण होते. आपल्या भारतीय शिल्पातील कलश वाटोळा किंवा अंड्याच्या आकाराचा असतो, तर गांधार शिल्पातला टोकदार असतो. मैत्रेय, बोधिसत्त्व, वसुधारा या बौद्ध देवता व धन्वंतरी हे पौराणिक दैवत कलशधारी आहेत.

कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य मांगलिक चिन्ह असल्यामुळे त्याच्या सान्निध्यात व साक्षीने शुभकार्य घडवतात. प्रत्येक शुभप्रसंगात कार्यारंभी जशी गणरायाची पूजा होते, तसेच कलशाचे पूजन करतात. पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक म्हणजे कलश होय. संत ज्ञानेश्वरांनी गीतेला मंदिर व अखेरच्या अध्यायाला 'कलशाध्याय' म्हटले आहे. 

Web Title: Why is worship of Kalasha considered as worship of Panchmahabhuta? Read the details of this symbolic worship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.