आहार शास्त्र आणि धर्म शास्त्र यांच्या दृष्टीने सूर्यास्तापूर्वी जेवणे का उचित ठरते?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 05:43 PM2021-03-27T17:43:13+5:302021-03-27T17:47:48+5:30
आपल्या शरीरावर निसर्गाचा प्रभाव पडत असतो. आपण प्रकृतीशी जेवढे जुळवून घेऊ, तेवढे निरोगी राहू.
अलीकडच्या डाएट बाबतीत एवढा संभ्रम निर्माण झाला आहे, की कोणाचे ऐकावे आणि कोणाचे नाही अशी परिस्थिती आली आहे. तरीदेखील एका बाबतीत सर्व आहार तज्ज्ञांचे एकमत होते, ते म्हणजे सूर्यास्ताआधी जेवणे. या गोष्टीला धर्म शास्त्राने देखील दुजोरा दिला आहे. एवढेच नाही, तर पूर्वीच्या काळी या गोष्टीचे कटाक्षाने पालन केले जात असे. एवढेच काय, तर निसर्गात डोकावले तर पशु पक्षी देखील सूर्यास्तानंतर खात पित नाही. याचा अर्थ हा नियम निसर्गाला अनुसरून आहे का? यामागे नेमके कारण काय आहे, ते जाणून घेऊया...
पहिले कारण : सूर्यास्ताआधी जेवल्याने पचनक्रिया नियंत्रित राहते. सेवन केलेले अन्न दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत व्यवस्थित पचते.
दुसरे कारण : सूर्यास्ताआधी जेवल्याने अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव होतो. रात्रीचे जेवण उशिरा घेतल्यामुळे ते पचत नाही आणि विविध रोग शरीरात घर करतात.
तिसरे कारण : सूर्यास्तानंतर सूर्य प्रकाशा अभावी वातावरणात सूक्ष्म जिवाणूंचे साम्राज्य वाढते. ते जिवाणू अन्नात शिरकाव करतात आणि त्यामुळे अनेक व्याधी जडतात.
चौथे कारण : सूर्यास्तानंतर प्रकृतीत अनेक बदल घडतात. पशु पक्षी देखील सूर्यास्ताआधी जेवून झोपी जातात. आपल्या शरीरावर निसर्गाचा प्रभाव पडत असतो. आपण प्रकृतीशी जेवढे जुळवून घेऊ, तेवढे निरोगी राहू. म्हणून ही दिनचर्या आत्मसात करणे सोयीस्कर ठरते.