जेवण झाल्यावर ताटात हात धुणे अशुभ का मानले जाते, त्यामागे आहे 'असे' शास्त्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 12:46 PM2021-06-03T12:46:51+5:302021-06-03T12:50:10+5:30
अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या बळी राजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्न पूर्णेचे आभार मानायला विसरू नका.
आपल्याकडे सोळा संस्कारांमध्ये एक संस्कार आहे अन्नग्रहण संस्कार. हा संस्कार पाच-सहा महिन्याच्या शिशुवर केला जातो. तिथपासून पुढे आयुष्यभर या संस्काराचे पालन आपण करत असतो. जेवणाच्या सवयी, नियम आणि शिस्त यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. म्हणून चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजेत. जसे की जेवण झाल्यावर ताटात हात धुणे.
बर्याच घरात जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते. ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणताही शास्त्राधार नाही.उलट तसे करणे फारच ओंगळवाणे दिसते. एकवेळ, जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुवून टाकणे, यात शिस्त दिसून येईल परंतु ताटात हात धुणे, हे शास्त्राला धरून नाही. शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयींनमुळे दारिद्रय येऊ शकते.
अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते. त्याअर्थी अन्न हे शक्तीचे रूप आहे. म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो. आणि सकस भोजनाने प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो. परंतु रिकाम्या ताटात खरकट्या हाताचे पाणी टाकणे, हा अन्नपूर्णेचा अपमान आहे. त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोष आपण ओढवून घेत असतो. यासाठी ताटात पाणी टाकणे योग्य नाही.
मूळ शास्त्र काय?
तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न ही त्यात टाकलेली आहुती आहे. 'अन्न हे पूर्णब्रह्म, उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' असे आपण जेवणापूर्वीच्या श्लोकात म्हणतो. याचा अर्थ पोट भरावे म्हणून जेवत नाही, तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवतो. आपल्या पोटात जो अग्नी आहे, त्यात अन्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नी शांत करण्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली, अशी त्यामागे भावना असते. तळ हातावर घेतलेले पाणी ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते. त्यामुळे त्या पाण्याला तीर्थ रूप प्राप्त होते. आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले, त्याच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते. यासाठीच शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणे इष्ट ठरते, अन्यथा त्याचा उलट परिणाम भोगावा लागू शकतो.
जेवतांना साधे सोपे नियम लक्षात ठेवावे.
- जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार माना.
- गरज असेल तेवढेच अन्न घ्या, ताटात अन्न वाया घालवू नका.
- आपल्या ताटाबाहेर सांडलेले अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमण्या कावळ्यांना घाला.
- जेवताना आसन घेऊन बसा. जमिनीवर थेट बसू नका. शक्य असल्यास बसायला कापडी आसन आणि ताटाखाली पाट किंवा चौरंग घ्यावा. त्यामुळे ताटाभोवती बारीक जीव जिवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करणार नाहीत.
- जेवताना मांडी घालून बसा. पलंगावर बसून जेवू नका. वृद्धांनी टेबल खुर्ची तर तरुणांनी भारतीय बैठक घालून सहभोजन करा.
- जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या. आपले उष्टे खरकटे अन्न दुसऱ्या कोणाला उचलू न देता, स्वतःच उचलून टाका.
- चालत फिरत जेवू नका. एका जागी बसून शांत चित्ताने जेवा.
- जेवताना बोलू नका. अप्रिय विषय काढू नका. वाद घालू नका. रडू नका. आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्या.
- प्रत्येक घास चावून चावून खा. सावकाश जेवा. चमच्यांचा वापर करण्याऐवजी हाताने जेवा. त्यामुळे अन्न स्पर्श आणि अन्न रस यांची जाणीव समृद्ध होते.
- अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या बळी राजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्न पूर्णेचे आभार मानायला विसरू नका.