मार्गशीर्ष महिन्यात दत्त उपासनेला एवढे महत्त्व का व ती कशी करावी? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 01:02 PM2021-12-02T13:02:38+5:302021-12-02T13:03:39+5:30

आपल्याकडे बारा महिन्यांच्या एकेक अधिदेवता आहेत. पैकी मार्गशीर्ष महिन्याची अधिदेवता केशव आहे. तीच दत्तरूपातही पुजली जाते.

Why is lord Datta worship so important in the month of Margashirsha and how to do it? Find out! | मार्गशीर्ष महिन्यात दत्त उपासनेला एवढे महत्त्व का व ती कशी करावी? जाणून घ्या!

मार्गशीर्ष महिन्यात दत्त उपासनेला एवढे महत्त्व का व ती कशी करावी? जाणून घ्या!

googlenewsNext

हिंदू पंचागानुसार चैत्र, वैशाखादी मासगणनेतील `मार्गशीर्ष' हा नववा महिना. ह्याच्या पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले.  गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी `मासानां मार्गशीर्षोऽहम' म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. ५ डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. त्यानिमित्त ही सविस्तर माहिती...  

बहुत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकर:।

गायनात बृहत्साम योग्य श्रुती, छंदांमध्ये गायत्री छंद, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि ऋतुंमध्ये वसंत ऋतू श्रेष्ठ आहे, असे वरील श्लोकात म्हटले आहे. त्यानुसार या महिन्यात गंगास्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे, तसेच दान-धर्म करून पुण्यसंचय करावा, असे म्हटले जाते. 

इतर नक्षत्रांप्रमाणे मृृगशीर्ष नक्षत्रालादेखील अग्रहायणी म्हणजेच वर्षारंभीचे नक्षत्र म्हटले आहे. मृगादि नक्षत्रगणना जेव्हा प्रचारात होती, तेव्हा  मृग नक्षत्राला अग्रस्थान मिळाले. त्यावरून मार्गशीर्ष महिन्यालाही पुढे श्रेष्ठत्व आले असतावे, हा विचार लोकमान्य टिळकांनी आरोयन या ग्रंथातून मांडला आहे. 

आपल्याकडे बारा महिन्यांच्या एकेक अधिदेवता आहेत. पैकी मार्गशीर्ष महिन्याची अधिदेवता केशव आहे. हेमंत आणि शिशिर ऋतूंमध्ये करावयाच्या अनरक ह्या ऋतुव्रताचा प्रारंभ मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला करतात. रोज केशवाची पूजा आणि त्याच्या ह्याच नावाचा १०८ वेळा मंत्रजप असा व्रताचा विधी आहे. याखेरीजही मार्गशीर्ष महिन्यात अनेक व्रतांचा सुकाळ असतो. एक दोन नाही, तर तब्बल नव्वदाहून अधिक व्रत वैकल्ये मार्गशीर्ष महिन्यात असतात. यथाशक्ती ही व्रत-वैकल्ये करून आपली आध्यात्मिक बैठक पक्की करणे, हाच त्यामागील मुख्य हेतू असतो. 

मार्गशीर्षाच्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत भक्तीभावाने केले जाते. आयुष्यात सुख, समाधान हवे आणि संयम बाळगता यावा, म्हणून हे व्रत केले जाते.  मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव हे मुख्य आकर्षण असते. त्यानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. दत्तबावनी म्हटली जाते. याशिवाय याच महिन्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगायला सुरुवात केली होती. विश्वाला मार्गदर्शन करणारा हा तत्त्वज्ञानरूपी ग्रंथ या मासात सुरु झाला, ती तिथीदेखील गीता जयंती म्हणून साजरी केली जाते. म्हणून या महिन्यात भगवद्गीता वाचन, विष्णुसहस्रनाम पठण, गजेन्द्रमोक्ष वाचन जरूर करावे. ओम केशवाय नम:, ओम दामोदराय नम: या मंत्रांचा जप करावा.    

भक्तीभावाला, परमार्थाला, आत्मचिंतनाला पुरक असा हा महिना असल्यामुळे या मासात शक्यतो अपेयपाय, अभक्ष्यभक्षण केले जात नाही. एवढेच काय, तर कांदा-लसूणही खाल्ले जात नाही. या सर्व गोष्टींमुळे मन चंचल होते, ब्रह्मचर्य ढळते आणि प्रभुकार्यात अडथळे येतात, म्हणून शास्त्राने त्यावर बंधन घातले आहे.  

त्यामुळे आपणही मनाने व शरीराने पथ्य पाळून प्रभूकार्यात मन गुंतवावे आणि या मासाचे स्वामी विष्णू तथा दत्त गुरु यांना प्रार्थना करावी-

शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता!
तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हितकर्ता,
तू आत्मस्वजन, भ्राता, सर्वथा तूची त्राता,
भयकर्ता तू भयहर्ता दंडधर्ता तू परिपाता,
तुजवाचुनि न दुजी वार्ता, तू आर्ता आश्रयदत्ता।

Web Title: Why is lord Datta worship so important in the month of Margashirsha and how to do it? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.