महादेवांना कुटुंबवत्सल का म्हटले जाते? बैरागी असूनही त्यांच्याकडे कुटुंबसौख्याची श्रीमंती कशी? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 07:00 AM2023-04-10T07:00:00+5:302023-04-10T07:00:01+5:30

कुमारी मुली म्हादेवासारखा भोळा नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करतात; असे कोणते गुण महादेवांना श्रेष्ठ बनवतात? जाणून घ्या!

Why Mahadev is called Kutumbvatsala? How can they have family happiness despite being poor? Read on! | महादेवांना कुटुंबवत्सल का म्हटले जाते? बैरागी असूनही त्यांच्याकडे कुटुंबसौख्याची श्रीमंती कशी? वाचा!

महादेवांना कुटुंबवत्सल का म्हटले जाते? बैरागी असूनही त्यांच्याकडे कुटुंबसौख्याची श्रीमंती कशी? वाचा!

googlenewsNext

शिवशंकर हे खरे कुटुंबवत्सल! योगी, बैरागी, समाधिस्थ असे त्यांचे रूप आपण पाहतो. पण त्यांच्या कथा ऐकताना गोष्टीची सुरुवात नेहमी, 'एकदा कैलासावर शंकर पार्वती बसले होते' या वाक्याने होते. याचा अर्थ विश्वाचा व्याप सांभाळूनही ते आपल्या कुटुंबाला पूर्ण वेळ देतात हे सिद्ध होतं. ते गणोबाचं कौतुक करतात, कार्तिकेयाला मोठा मुलगा म्हणून घडवतात. दोन मुलांमध्ये स्पर्धा लावून जबाबदार पित्याप्रमाणे त्यांची भांडणं सोडवतात. शिवाय उमेवर जीवापाड प्रेम करतात. देव दानव यांच्यात भेद न करता जो मनोभावे साद घालेल त्याच्यावर प्रसन्न होतात.

असा हा संसारी असूनही योगी पुरुषांप्रमाणे विरक्त राहणारा देव उमेला कसा काय आवडला? हा तिच्या पित्याला पडलेला प्रश्न! विष्णूंकडचं स्थळ सांगून आलेलं असताना, वैभव लक्ष्मीचं सुख पायाशी लोळण घेत असताना पार्वतीला हा स्मशानपती का आवडावा, हे न उलगडलेलं कोडं! त्यावर उमाही निरुत्तर! प्रेम शब्दात सांगता आलं असतं तर काय हवं होतं? वैकुंठाचं वैभव सोडून तिने लंकेची पार्वती होणं पसंत केलं. शंकरांनी तिला पायाशी नाही तर हृदयाजवळ स्थान दिलं, अर्धनारीनटेश्वर स्वरूपात आणि ती सुद्धा त्यांची सावली बनून वावरू लागली.

सह अंब तो सांब! असा हा सांब सदाशिव पार्वती शिवाय अपूर्ण आहे, हे तो स्वतः मान्य करतो. एकटा जीव सदाशिव! जिथे शिव तिथे शक्ती आणि जिथे शक्ती तिथे शिव! दोघांपैकी एकानेही दुसऱ्याची साथ सोडली, तर उरेल फक्त शव...!

शिवशंकराने कुटुंबाबरोबर विश्वाची जबाबदारी सार्थपणे पेलून धरली आहे. समुद्र मंथनातून आलेली रत्न देव दानवांनी बळकावली, पण हलाहल घ्यायला कोणी पुढाकार घेईना! बरोबर आहे, वाईटपणा कोण घेणार हा प्रश्न नेहमीचाच! शिवशंकराने जगाच्या कल्याणासाठी विषाचा प्याला ओठी लावला आणि राम नामाने तो दाह शांत केला. तेव्हापासून ते आजही समाधिस्थ अवस्थेत असतात, तेव्हा अखंड राम नाम घेत असतात.

शिवशंकराच्या ठायी असलेली शांतता अनुभवायची असेल, तर शिवालयाला पर्याय नाही. तिथल्या वातावरणातील शांतता क्षणार्धात मनात उतरते. मनातले सगळे प्रश्न संपून 'ऑल इज वेल' ही ग्वाही मिळते आणि आशा भोसले यांचे शब्द कानी घुमतात... माझ्याकडे देव माझा पाहतो आहे...मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश!  आहे की नाही हे कुटुंब आपल्यापैकीच एक...!

Web Title: Why Mahadev is called Kutumbvatsala? How can they have family happiness despite being poor? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.