घरात शनी देवांची मूर्ती किंवा प्रतिमा का ठेवू नये, त्यामागे 'हे' आहे शास्त्र !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 04:29 PM2021-05-03T16:29:41+5:302021-05-03T16:30:01+5:30
शनी महाराज ही उग्र स्वभावाची देवता असल्यामुळे, त्यांच्या सहवासात येताना सभोवतालचे वयल तेवढेच प्रभावित असावे लागते, अन्यथा अरिष्ट परिणाम भोगावे लागतील.
शनी देवांचे नुसते नाव काढले, तरी एक प्रकारची भीती मनात निर्माण होते. बरोबर आहे, शालेय वयापासून शिक्षा करणाऱ्या शिक्षकांचीच सर्वात जास्त भीती वाटत आली आहे. ही भीती आदरयुक्त भीती असते. कारण असे शिक्षक आपल्याला योग्य वळण लागावे म्हणून प्रसंगी कठोर होऊन शिक्षा देतात. त्याचप्रमाणे शनी देव हे सुद्धा कठोर शिक्षक आहेत. म्हणून इतर देवांच्या तुलनेत आपल्याला त्यांची जास्त भीती वाटते. साडेसाती काळात ते आपल्या आयुष्याला चांगले वळण लागावे, म्हणून हर तऱ्हेने परीक्षा घेतात आणि जे विद्यार्थी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांच्यावर शनी देव प्रसन्न देखील होतात.
अशा शनी देवांना आपण आपल्या देवघरात मूर्ती स्वरूपात किंवा घरात एखाद्या प्रतिमे स्वरूपात का बरे ठेवले नाही? घरात अन्य देवांची प्रतिमा, मूर्ती असून सुद्धा शनी देवांची प्रतिमा निषिद्ध का? याबाबत शास्त्रीय आणि पौराणिक कारण सांगितले जाते.
पौराणिक कथा असे सांगते, की शनी देवांना शाप मिळाला होता, की त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडेल, त्याचा विनाश होईल. म्हणून त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात ठेवली जात नाही. त्यासाठी मंदिराची जागा सुयोग्य ठरते.
शनी महाराज ही उग्र स्वभावाची देवता असल्यामुळे, त्यांच्या सहवासात येताना सभोवतालचे वयल तेवढेच प्रभावित असावे लागते, अन्यथा अरिष्ट परिणाम भोगावे लागतील. शनी महाराजांच्या मंदिराची रचना ही तेथील भूमीचा, वातावरणातील लहरींचा आणि सभोवतालच्या परिसराचा अभ्यास करून बांधलेली असते. या गोष्टी घराच्या चार भिंतीत साकारणे शक्य नाही. म्हणून शनी महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात न ठेवता देवळातच ठेवली जाते.