अंत्यसंस्कारानंतर मागे वळून का पाहत नाहीत? गरुड पुराणात आढळतो महत्त्वाचा उल्लेख; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 02:23 PM2022-02-04T14:23:01+5:302022-02-04T14:25:57+5:30
गरुड पुराणात भौतिक जीवनाव्यतिरिक्त अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या आहेत.
पृथ्वीतलावर मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. जो जीव जन्माला आला, त्याचा मृत्यू होणारच हे निर्विवाद सत्य आहे. शिव पुराण, गरुड पुराण आणि कठोपनिषद या काही ग्रथांमध्ये मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतरच्या काही बाबींचा उल्लेख झालेला आढळून येतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपापल्या चालीरितींप्रमाणे अंत्यसंस्कार केले जातात. मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी, यासाठी विशेष प्रार्थनाही केली जाते. मात्र, श्मशानात मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मागे वळून पाहू नये, असे सांगितले जाते. यासंदर्भातील काही उल्लेख आणि कारणे गरुड पुराणात आढळून येतात.
भारतीय संस्कृती परंपरा यांमध्ये १८ पुराणांचा उल्लेख आढळून येतो. या सर्व पुराणांमध्ये मनुष्य जन्म आणि मृत्यूविषयक गोष्टींचा उहापोह केलेला दिसतो. यामध्ये गरुड पुराण महत्त्वाचे मानले गेले आहे. गरुड पुराणात भौतिक जीवनाव्यतिरिक्त अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या आहेत. पुराणात असा उल्लेख आहे की, आत्म्याचा वध करणे कोणालाही शक्य झाले नाही. याशिवाय आत्मा शरीर जळताना पाहतो, असे सांगितले जाते.
अंत्यसंस्कारानंतर मागे वळून का पाहत नाहीत?
गरुड पुराणानुसार, अंत्यसंस्कारानंतरही आत्म्याला शरीराची आसक्ती असते. आत्म्याला शरीराकडे परत जाण्याची आसक्ती वाढते. यामुळेच अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहिल्यास गेलेल्या व्यक्तींमध्ये कोणाचातरी जीव अडकलेला आहे, ते आत्म्याला दिसते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. आत्मा शरीराच्या आसक्तीत अडकतो, त्यानंतर त्यातून बाहेर पडणे कठीण होते. अंत्यसंस्कारानंतर कोणीही मागे वळून पाहत नाही याचे हे एक कारण आहे. अंत्यसंस्कारानंतर मागे वळून न पाहिल्यास आत्म्याला आपोआप संदेश मिळतो की आता शरीराची आसक्ती नाही. कोणीही गेलेल्या व्यक्तींमध्ये अडकून राहिलेले नाही.
त्यागलेले शरीर पुन्हा एकदा धारण करण्याचा प्रयत्न करतो
आत्मा जेव्हा शरीराचा त्याग करते, तेव्हा काही काळापर्यंत अचेत स्थितीत असते. आत्म्याला चेतना अवस्था प्राप्त झाली की, आपल्या परिवाराला, कुटुंबातील सदस्यांना, वारसांना पाहून आत्मा दुःखी होते, असे मानले जाते. त्यागलेले शरीर पुन्हा एकदा धारण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आत्म्याला उत्तम गती मिळावी यासाठी तर्पण, पिंडदान केले जाते.