निर्माल्य केराच्या टोपलीत का टाकू नये? त्यामागील शास्त्रीय कारण वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 09:51 AM2021-05-15T09:51:24+5:302021-05-15T09:51:43+5:30
देवांमधील चैतन्याचा गंध या फुलांच्या माध्यमातून मंदिरात, घरात दरवळून आपणास प्राप्त होतो. यापुढे त्या फुलांना, माळांना पावित्र्य प्राप्त होते. तेव्हा अशा कोणत्याही पवित्र वस्तुला पाय लावीत नाहीत.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये केर काढणाऱ्या केरसुणीलाही लक्ष्मी मानतात. तिचे दिवाळीत पूजन करतात. तिला चुकून जरी पाय लागला तरी नमस्कार करतात. तेव्हा अशा या अतिउच्च संस्कृतीमध्ये देवाला आदल्या दिवशी वाहिलेल्या व दुसऱ्या दिवशी निर्माल्य झालेल्या फुलांनाही महत्त्व दिले आहे. यात नवल नाही.
पण पूजा ही मूलत: आर्य संस्कृतीमध्ये नव्हती. आर्यांना पूजन माहित नव्हते, त्यांना यजन माहित होते. ऋग्वेदामध्ये पूजा हा शब्द देखील नाही. पूजा हा द्राविड भाषेतील शब्द आहे. त्यातील पू चा अर्थ पुष्प असा आहे. पू अधिक जेय म्हणजे पुष्पलंकरण होय. त्यावरून पुढे पूजा हा शब्द आपल्याकडे निर्माण झाला असावा. यातील तात्पर्य असे की पूजेच्या वेळी देवांना फुले वाहून अलंकृत करण्यात येते. दुसऱ्या दिवशी त्याचे रुपांतर निर्माल्यात होते.
'देवस्वत्वनिवृत्तिविशिष्ट देवदत्तं वस्तू' म्हणजे देवाला अर्पण केलेली, पण नंतर देवाने तिच्यावरील स्वामित्त्व काढून घेतलेली अशी जी वस्तू ती निर्माल्य होय. मग ती फुले असोत वा दूर्वा तुळशीसारखी तृणपल्लवी असो. बेल मात्र त्याला अपवाद आहे. तो कितीही वेळा वाहिला तरी त्याचे निर्माल्य होत नाही.
काही काही पूजांची लागलीच सांगता होते. तेव्हा अशा प्रसंगी देवाला वाहिलेली फुले पुष्पमाला किंवा देवाला एकदा वाहून काही वेळाने काढलेल्या पुष्पमाला, फुले ही सुद्धा निर्माल्यच मानतात.
देवांमधील चैतन्याचा गंध या फुलांच्या माध्यमातून मंदिरात, घरात दरवळून आपणास प्राप्त होतो. यापुढे त्या फुलांना, माळांना पावित्र्य प्राप्त होते. तेव्हा अशा कोणत्याही पवित्र वस्तुला पाय लावीत नाहीत. इतकेच नव्हे, तर देवांवरील असे निर्माल्य काढल्यानंतर तो आपल्या भाळी लावून हुंगतात, त्यात सुरलेल्या देविक चैतन्याचाही लाभ व्हावा, ही भावना असते. याला शिव निर्माल्य मात्र अपवाद आहे. कारण सुखी जीवन जगावे अशी निर्माल्य हुंगण्यामागील भावना असते. शिव ही संहारक देवता असल्याने त्याचा निर्माल्य हुंगीत नाहीत, असे सर्व प्रकारचे निर्माल्य साठवून किंवा लागलीच नदी किंवा जलाशयात टाकतात. केराच्या टोपलीत टाकत नाहीत. कारण त्याच्या पावित्र्याला धक्का लागू नये, ही त्यामागील श्रद्धा असते.