तिरुपतीला गेल्यावर केस दान का करतात? पाहा, मान्यता आणि प्राचीन कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 04:04 PM2021-12-25T16:04:58+5:302021-12-25T16:06:01+5:30
तिरुपती बालाजी मंदिरात केसाचे दान करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.
भारतात भक्तीभाव आणि श्रद्धेला अजिबात तोटा नाही. देशातील हजारो मंदिरात कोट्यवधी भाविक दर्शनाला जात असतात. आपल्या देशाला हजारो वर्षांची प्राचीन परंपरा आहे. देशातील शेकडो मंदिरे प्राचीन असून, स्थापत्य कलेचा अद्भूत नमुना आहेत. तसेच अनेक मंदिरे प्रचंड श्रीमंत आहेत. यातील एक प्रमुख नाव म्हणजे आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिर. या मंदिराची भव्यता आणि दिव्यता अचंबित तसेच स्तिमित करणारी आहे. देशातील अनेक मंदिरात विविध प्राचीन प्रथा, परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत. त्या देशभरात प्रसिद्ध आहेत.
तिरुपती बालाजी मंदिरात केसाचे दान करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. केवळ पुरुष नाही, तर स्त्रियाही केसांचे दान करतात. तिरुपती बालाजी मंदिरात येऊन केसाचे दान केल्यास लक्ष्मी मातेची कृपा होते, असे सांगितले जाते. हजारो भाविक आपल्या इच्छा, आकांक्षा घेऊन तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जातात आणि केसाचे दान करतात. भाविक जेवढे केस दान करतात, त्यापेक्षा १० पट अधिक तिरुपती बालाजी परत देतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मात्र, या प्रथेमागे एक कथा असल्याचे सांगितले जाते.
प्राचीन कथेनुसार, बालाजी देवतेच्या ठिकाणी मुंग्याचा पर्वत बनला होता. तिथे एक गोमाता येत असे आणि दूध देत असे. अनेकदा असे घडले. एक दिवस गाईच्या मालकाने ते पाहिले तो क्रोधीत झाला. जवळच पडलेली एक कुऱ्हाड घेतली आणि गाईवर उगारली. मात्र, बालाजी देवतेला तो घाव लागला आणि त्यावेळी काही केसही तुटले. यानंतर नीला देवीने तातडीने येऊन आपले काही केस कापले आणि बालाजी देवतेला घाव झाला होतो, तेथे ठेवले. नीला देवीने तसे करताच तिरुपती बालाजी देवाचा घाव भरला. या कृतीने नारायण प्रसन्न झाले आणि म्हणाले की, केस हा शारिरीक सुंदरतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. असे असूनही त्याचा त्याग करून घाव भरला. जी व्यक्ती अशा प्रकारे केसांचा त्याग करून अर्पण करेल, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असे वरदान तिरुपती बालाजी देवाने दिले.
केसांचे दान करणे म्हणजे पाप आणि चुकीच्या गोष्टींचा त्याग करणे असे मानले जाते. चुकीच्या गोष्टींचा त्याग करून सत्कर्माच्या मार्गाला लागलेल्या माणसावर लक्ष्मी देवीचे विशेष कृपाशिर्वाद राहतात. लक्ष्मी देवी सुख, समृद्धी, वैभव, संपन्नता देऊन भरभराट देते, अशीही मान्यता असल्याचे सांगितले जाते. तिरुपती बालाजी मंदिरात दररोज जवळपास सुमारे २० हजार भाविक केस दान करतात, असे सांगितले जाते.