मंदिरात घंटानाद का करावा आणि कितीदा करावा? जाणून घ्या त्यामागील शास्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 08:00 AM2022-03-22T08:00:00+5:302022-03-22T08:00:09+5:30

कर्णकर्कश घंटानाद करून मंदिरातील शांततेचा भंग करू नये. मग तो कितीदा आणि का करावा ते वाचा.

Why ring the bell in the temple and how often? Learn the science behind it! | मंदिरात घंटानाद का करावा आणि कितीदा करावा? जाणून घ्या त्यामागील शास्त्र!

मंदिरात घंटानाद का करावा आणि कितीदा करावा? जाणून घ्या त्यामागील शास्त्र!

Next

रोज सकाळी स्नान करून मंदिरात देवदर्शनाला जावे, असा आपल्या हिंदू संस्कृतीचा संस्कार आहे. रोज सकाळी मंदिरात जाणे शुभकारक असते. ही वेळ शांततेची असते. सभोवतालचे वातावरण प्रसन्न असते. पवित्र असते. अशा मंगलसमयी मंगलदर्शनाने दिवसाची सुरुवात केली असता दिवस छान जातो. म्हणून रोज सकाळी मंदिरात जाण्याचा शिरस्ता ठेवावा.

मंदिरात जाताना चपला बाहेर काढून, पाय धुवून मगच मंदिरात प्रवेश करावा. मंदिराच्या पायरीला नमस्कार करून मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम घंटानाद करावा. हा घंटानाद कशासाठी व कोणासाठी? घंटानाद देवाला प्रिय आहे. तो कानावर पडला असता देवाला जाग येऊन दर्शनार्थ आलेल्या भक्ताकडे त्याची दृष्टी जाते. या दृष्टीच्या तेजामुळे दृष्ट प्रवृत्ती नष्ट होते.
 
आगमनार्थं तु देवानां गमनाथरं तु राक्षसाम् ।
कुर्वे घण्टारवं ततर देवताहृान लक्षणम् ।।

अनग्राहक देवांच्या आनगमासाठी व प्रतिबंधक राक्षसांच्या निर्गमनासाठी घंटानाद करावा. हे देवतांच्या आवाहनाचे उपलक्षण आहे. घंटानाद एकदाच करावा. कर्णकर्कश घंटानाद करून मंदिरातील शांततेचा भंग करू नये. घंटानाद करून देवाची पूजा केली असता भक्ताच्या रक्षणाची जबाबदारी भगवंत घेतो अशी भक्तांची श्रद्धा असते.

घंटानाद झाल्यावर देवाला दोन्ही हात जोडून मस्तक नत करून म्हणजेच झुकवुन नमस्कार करावा. नमस्कार तीन प्रकारे केला जातो. कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे जेव्हा आपण देवासमोर साष्टांग नमस्कार घालतो, तेव्हा आपल्या देहाचे आठ अवयव जमीनिला लागतात, त्याला अष्टांग नमस्कार म्हणतात. तसा नमस्कार किंवा गुडघ्यावर बसून माथा देवाच्या चरणांवर अथवा देवासमोर नतमस्तक करणे हा कायिक नमस्कार झाला. वाचेने देवाचे नामस्मरण करणे, जप जाप्य करणे, मंत्र म्हणणे, स्तोत्र म्हणणे याला वाचिक नमस्कार म्हणतात. मंदिराबाहेरून जाताना किंवा मनातल्या मनात देवाला स्मरून कार्यारंभ करताना जो नमस्कार केला जातो त्याला मानसिक नमस्कार म्हणतात. परंतु मंदिरात गेल्यावर शक्यतो कायिक नमस्कार करावा. 

जो देव आपल्या आवडीचा असतो, त्याची प्रार्थना करावी. आपल्या आवडत्या दैवताचा श्लोक म्हणावा, मंत्र म्हणावा, जपाची माळ ओढावी. देवाचे दर्शन घेऊन, प्रदक्षिणा घालून काही क्षण मंदिराच्या सभागृहात शांतचित्ताने बसावे. मंदिरातल्या सकारात्मक लहरींचा मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि नवीन ऊर्जा प्राप्त होऊन सकारात्मक विचारांनी दैनंदिन कामाची आनंदात सुरुवात होते. देवदर्शन हे देवासाठी नसून आपल्यासाठी लाभदायक असते, हा विचार कायम ध्यानात ठेवावा. 

Web Title: Why ring the bell in the temple and how often? Learn the science behind it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.