विशेषत: स्त्रियांनी तुळशीचे पूजन का करावे? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 05:19 PM2021-07-05T17:19:14+5:302021-07-05T17:19:35+5:30
तुलसी महात्म्य समजून घेण्यासाठी तुळशीचा नित्य सहवास नको का? म्हणूनच स्त्रियांनी तुळशीची नित्यपूजा करावी असे धर्म शास्त्र सांगते.
तुळशी ही लक्ष्मीस्वरूप आहे म्हणून कार्तिक शुक्लपक्षात आपण विष्णूबरोबर तिचा विवाह करतो. बायकोला आपण गृहलक्ष्मी म्हणतो. गृहलक्ष्मीने मुख्य लक्ष्मीचे रोज पूजन करणे युक्तच आहे. या पूजेने चंचल असलेली लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहावी, अशी गृहलक्ष्मी पूजा करून तिची प्रार्थना करते.
पृथ्वीभोवती ओझोन वायूचा जाड थर आहे व तो आवश्यक आहे. औद्योगिकरणामुळे जे प्रदुषण होत आहे ते ओझोन वायुमुळे अडवले जाते. पण वाढत चाललेल्या प्रदूषणाने हा थर कमी होत आहे व त्याचे मानवावर दुष्परिणाम होतील असे शास्त्रज्ञ नेहमी सांगत असतात.
तुळशीमध्ये हा ओझोन नावाचा वायू आहे. तो वायू स्त्रियांना फारच हितावह आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पूर्व सुरीनी हे जाणून स्त्रियांनी तुलसीपूजन करण्याचा धर्मात अंतर्भाव केला आहे. स्वाभाविकच तुळशीजवळ जावे लागते. तिचा स्पर्शही होतो, त्यामुळे स्त्रियांना आवश्यक असलेला वायू सहज मिळतो. तुळशीला प्रदक्षिणा घातल्यावर हा ओझोन वायू अधिक मिळतो व लाभही अधिक होतो.
तुळशी दारात लावणे ही हिंदूंच्या घराची खूण आहे. धर्म शास्त्राने तुळशी वृंदावन लावावे असे सांगितले होतेच, परंतु विज्ञानाने महत्त्व पटवून दिल्यावर तुळशीच्या रोपाबद्दल अधिक जनजागृती झाली.
आयुर्वेदाच्या दृष्टीने तुळस ही उत्तम कफघ्न आहे. सर्दी पडसे या विकारांवर उत्तम औषधी आहे. दम्याच्या विकारांवरही गुणकारक आहे.
असे हे तुलसी महात्म्य समजून घेण्यासाठी तुळशीचा नित्य सहवास नको का? म्हणूनच स्त्रियांनी तुळशीची नित्यपूजा करावी असे धर्म शास्त्र सांगते.