सदगुरुंना शरण का जावे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:20 PM2021-01-13T17:20:57+5:302021-01-13T17:21:37+5:30
मनुष्य सुख मिळाले की अनंदीत होतो व दुःख आले की मनात कष्टी होतो.
सदगुरुंना शरण का जावे ?
ते यासाठी की, सदगुरुंनी जे जाणले ते गम्य, तो सहज आकलन न होणारा आनंद गुरुकृपेने खर्या शिष्याला लाभतो. एकनाथ महाराज म्हणतात, गुरुंचा अशा दृष्टीने लाभलेला उपदेश शिष्याला व्दंव्दात बांधु शकत नाही.
अदृष्टें देहीं वर्ततां देख । बाधूं न शके सुखासुख ।
हें गुरुगम्य अलोलिक । शिष्य श्रध्दिक पावती ॥
अदृष्ट म्हणजे जे नजरेत येत नाही. प्रारब्ध मनुष्याचे दृष्टीत येत नाही म्हणून त्याला संत अदृष्ट म्हणतात. नाथ माऊली म्हणतात, सदगुरु उपदेश करतात की, प्रारब्धाला स्वीकारले तर सुखासुख म्हणजे सुख व असुख म्हणजे दुःख मनुष्याला बांधु शकत नाहीत. जीवनात सुख व दुःख येणारच. सुख दुःख आहे त्याचे नांवच संसार आहे. कधी सुख येते कधी दुख येते. ते अपरिहार्य आहे. दिवस व रात्र आळीपाळीने यावी तसे सुख दुःख येत राहतात. पण मनुष्य सुख मिळाले की अनंदीत होतो व दुःख आले की मनात कष्टी होतो.
परंतु तुम्ही ते स्वीकारा, हे गुरुगम्य, हा गुरु उपदेश तुम्ही जाणला तर त्याचे अलौकिकत्व कळेल. पण हे तेव्हाच कळते जेव्हां शिष्य श्रध्दावान असेल. श्रध्दा असेल तरच गुरुगम्य जे आहे जाणले जाऊ शकते. गुरुगम्य ज्याने जाणले त्याला सुख दुःख बाधु शकत नाहीत. गुरु जाणतात की, प्रारब्ध तर ब्रह्मज्ञान्यालाही चुकले नाही.
एकनाथ महाराज म्हणतात,
जरी झाले ब्रह्मज्ञान तरी ब्रह्मज्ञान्यालाही प्रारब्ध सुटत नाही. कारण मनुष्यानेच कर्मांना दिलेल्या गतीचा प्रारब्ध परिणाम आहे. जसे कुलाल म्हणजे कुंभार चाकाला गती देतो व त्या चाकावर मातीचे भांडे हाताने आकार देवून तयार करतो व तयार झाले की उचलून घेतो. परंतु चाकाला जी गती दिली ती भांडे तयार झाले तरी थांबत नाही. तसेच मोठे झाड जर मुळासकट उन्मळून पडले तरी क्षणात सुकत नाही. कारण झाडात जी अनेक वर्षाची संचित आर्द्रता आहे ती कायम राहते. तेव्हा गुरु उपदेश हाच असतो की, आलेल्या सुख दुःखाचे गतीला पहा, त्या चक्राला अजून गती देऊ नका. म्हणजे चक्र थांबेल. झाड सुकविण्याची घाई करु नका, तुम्ही पहा ते सुकेल. प्रारब्धाचे तसेच आहे. आपण सायकलला पॅडल मारले की, पॅडलने जी गती दिली तेवढी सायकल चालणार. म्हणून प्रारब्धाची असलेली गती थांबेपर्यंत शांत चित्ताने पाहणे जरुरी आहे. साधु संतांवर वा विवेकवंतावर भोग आले तर ते स्वतःठायी असलेल्या शांतील धरुन वागतात. हा बोध गुरुगम्य आहे.
श्रध्देवीण सर्वथा । गुरुगम्य न ये हाता
गुरुगम्येंवीण तत्त्वतां । द्वंद्वसमता कदा न घडे ॥
शिष्याचे मनात, भक्ताचे मनात श्रध्दा नसेल तर गुरुने दिलेला बोध हाती येत नाही, अर्थात कळत नाही. जर बोध झाला नाही तर सुख दुःखामध्ये समतेचा, सुख दुःखाचे स्थितीत स्थिर राहण्याची स्थिती कधीही घडून येणे नाही. म्हणून सदगुरु चरणी लागून गुरुगम्य जाणावे.
अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज
परब्रह्म सच्चिदानंद समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज की जय !
सदगुरु श्री एकनाथ महाराजांना श्रध्दा नमन !
शं.ना.बेंडे पाटील