'त्या' चार दिवसांत स्त्रियांवर एवढी बंधने का घातली गेली?; त्यामागचा विचार समजून घ्या आणि विचार बदला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 05:30 PM2021-11-22T17:30:22+5:302021-11-22T17:30:59+5:30

मासिक पाळीच्या काळात स्त्रीने विश्रांती घ्यावी की नाही हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. 

Why were so many restrictions imposed on women during those four days ?; Understand and change your mind! | 'त्या' चार दिवसांत स्त्रियांवर एवढी बंधने का घातली गेली?; त्यामागचा विचार समजून घ्या आणि विचार बदला!

'त्या' चार दिवसांत स्त्रियांवर एवढी बंधने का घातली गेली?; त्यामागचा विचार समजून घ्या आणि विचार बदला!

Next

मासिक धर्म हा स्त्रियांसाठी शरीर धर्माचा एक भाग आहे. ते निसर्गाचे एक वरदान आहे. ज्यामुळे स्त्रीला मातृत्त्व व उत्तम आरोग्य लाभते. ही बाब सर्वांना माहीत असूनही मासिक पाळीच्या संबंधात आजही अनेक घरात कडक नियम पाळले जातात. मुळात एवढी बंधने स्त्रियांवर का घातली गेली ते आधी जाणून घेऊ. 

फार पूर्वी आपला भारत देश हा स्त्रीप्रधान संस्कृतीचा होता. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, अर्थात जिथे स्त्रियांची म्हणजेच स्त्रीशक्तीची पूजा होते तिथे देवतांचा वास असतो, असा भव्य दिव्य विचार असणारी आपली संस्कृती होती. त्याकाळात स्त्री सक्षम होती, स्वतंत्र होती. काळ पालटला. परकीयांची आक्रमणे झाली. स्त्रियांवर अत्याचार झाले. देश पारतंत्र्यात गेला. गुलामगिरीत गेला. अशा वेळेस स्त्रियांना जास्त जाच सहन करावा लागला. स्त्री अबला बनली. चूल आणि मूल एवढेच तिचे विश्व मर्यादित झाले. दळण, कांडण, जेवण, संगोपन या कक्षांमध्ये तिचे आयुष्य सीमित झाले. 

अशा रोजच्या कामाच्या धबडग्यात तिला निदान मासिक धर्माच्या वेळी थोडी उसंत मिळावी, म्हणून सक्तीची विश्रांती देण्यात आली. तसा दंडक शास्त्राने घालून दिला. या काळात स्त्रियांना विश्रांतीची सर्वाधिक गरज असल्याने तिला घरकामातून सुटी देण्यात आली. संसारात गुंतलेल्या स्त्रीने या नियमाचे काटेकोरपणे पालन करून स्वतःला विश्रांती द्यावी म्हणून त्याचा संबंध देवकार्याशी जोडण्यात आला. 'देव रागवेल' निदान या भीतीने पापभिरू स्त्रिया सक्तीची विश्रांती घेतील म्हणून अशौच पाळणे सुरू झाले. मात्र हळू हळू या साध्या नियमाचे अवडंबर एवढे झाले की त्याचे रूढी आणि प्रथेत रूपांतर झाले आणि स्त्रियांना विटाळ ठरवले जाऊ लागले. त्यामुळे स्त्री आणखीनच दडपली गेली आणि मासिक धर्म हा वाईट आहे अशी समजूत करून घेत कुढत राहू लागली. 

काळ पुन्हा बदलला. स्त्री सुशिक्षित झाली. सुसंस्कृत झाली. सुजाण झाली. स्वतःच्या आरोग्याप्रती सजग झाली. आजही स्त्रियांवर कामाचे, जबाबदारीचे ओझे आहेच, परंतु अत्याधुनिक उपकरणांमुळे पूर्वीच्या तुलनेत शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळे सक्तीची विश्रांती तिला नको वाटू लागली. ती स्वतःची काळजी घेत मुक्त वावर करू लागली. असे असताना स्वतःला विटाळ म्हणवून घेणे तिला अमान्य वाटू लागले व त्यात गैर काहीच नाही. मासिक पाळीच्या काळात स्त्रीने विश्रांती घ्यावी की नाही हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. 

ज्या विचाराने नियम बनवला गेला होता त्या नियमाची आता पूर्तता झाल्याने आपणही त्या प्रथेत कालानुरूप बदल करायला हवा. आपल्या देशात देवी देवतांची अनेक मंदिरं आहेत. जी प्रकृती आणि पुरुष यांच्यातील समानता दर्शवतात. त्यामुळे आपणही आपल्या विचारात समानता आणायला हवी आणि स्त्रियांवर बंधने न घालता निसर्गाने दिलेल्या वरदानाचा खुल्या दिलाने आणि खुल्या विचाराने स्वीकार करायला हवा. 

Web Title: Why were so many restrictions imposed on women during those four days ?; Understand and change your mind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.