बाळाचा दुग्धपान विधी का, केव्हा व कसा करावा? जाणून घ्या शास्त्रशुद्ध पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 04:25 PM2022-01-13T16:25:37+5:302022-01-13T16:26:08+5:30
बालकास दूध पाजणे हा किती साधा प्रसंग! पण त्यालाही संस्कारबद्ध करून धर्मशास्त्राने औचित्य कसे साधले आहे पहा...
हिंदू धर्मात प्रत्येक क्षण सोहळ्यासारखा साजरा केला जातो. मग तोरण असो वा मरण. अर्थात आनंदाचे क्षण असो वा दु:खाचे! थोडक्यात काय तर सर्वांनी सुख दु:खात सहभागी होऊन प्रत्येक क्षण साजरा करावा, अशी आपल्या धर्माची, संस्कृतीची इच्छा आहे आणि त्यानुसार आपल्या पूर्वजांनी नितीनियमांची आखणी केली केली आहे. यातच एक विधी असतो दुग्धपान विधी. तो कसा व कधी करायचा ते जाणून घेऊ.
दुग्धपान या विधीमध्ये बालकास शंखाने गायीचे दूध पाजण्यात येते. हा विधी जन्मानंतर दुसऱ्या जन्मनक्षत्री किंवा एकतीस दिवसांनी अथवा त्यापूर्वी अगदीच जरूरीचे वाटल्यास एखादा शुभदिवस पाहून करावा.
या संस्कारात प्रथम कुलदेवता व परोहित यांची पूजा करावी. बालकास अभ्यंगस्नान घालून नूतनवस्त्रे व अलंकार घालावेत. बालकाचे मस्तक पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे करून त्यास शक्यतो उजव्या बाजूने शंखाने गायीचे दूध प्राशन करवावे.
त्यापूर्वी शंख पाण्याने स्वच्छ धुवावा. या विधीसाठी नित्य वापरात नसलेला शंख तसेच वाजवायचा शंख घेऊ नये. त्याऐवजी चांदीचे गोकर्ण वापरावे. त्यावेळी रुढीनुसार काहीजण पुढील मंत्र म्हणतात-
नर्य प्रजां मे गोपाय, अमृतत्वाय जीवसे,
जातां जनिष्यमाणां च, अमृते सत्ये प्रतिष्ठिताम् ।
पय: पानेन हे बाल सुखं वर्धय मे गृहे,
गोक्षीरेणाचिरेण त्वममृतत्व लभस्व च।
तसे पाहता बालकास गायीचे दूध पाजवणे हा किती साधा प्रसंग! पण त्यालाही संस्कारबद्ध करून धर्मशास्त्राने औचित्य साधलेले आहे. हे दुग्धपान संस्कारपूर्वक केल्यास बालकास नैसर्गिकरित्या दुधाची आवड निर्माण होते व ते मूल पुढे दुधाचा तिटकारा करत नाही. व त्याला दुधाची आवड लागावी म्हणून कसरतही करावी लागत नाही.