प्रेमाने काम करा आणि कामावर प्रेम करा, तरच नेत्रदीपक यश मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 03:15 PM2021-06-04T15:15:27+5:302021-06-04T15:15:54+5:30

प्रत्येक काम ही तुमच्या भविष्याच्या इमारतीसाठी रचलेली वीट असते. ती ढासळली, तर तुमचा स्वप्नांचा बंगला कोसळेल.

Work with love and love work, only then will you get spectacular success! | प्रेमाने काम करा आणि कामावर प्रेम करा, तरच नेत्रदीपक यश मिळेल!

प्रेमाने काम करा आणि कामावर प्रेम करा, तरच नेत्रदीपक यश मिळेल!

Next

हत्ती गेला नि शेपूट राहिलं, ही म्हण आपल्या सर्वांनाच माहीत आहे. म्हणजे आपण सगळेच जण उत्साहाने काम करतो, परंतु कामाचा शेवटचा टप्पा कसातरी गुंडाळून मोकळे होतो. त्या शेवटच्या कामाचा आपल्या कंटाळा आलेला असतो. परंतु, हाच कंटाळा कधी कधी आपल्याला महागात पडू शकतो. कसा? त्यासाठी ही गोष्ट वाचा.. 

एक कारागीर होता. तो एका बिल्डरच्या हाताखाली कामाला होता. त्याने आजवर एकापेक्षा एक सुंदर बंगले, इमारती, वास्तु उभारल्या होत्या. जणू काही तो म्हणजे पृथ्वीवरचा विश्वकर्माच होता. अशी जादू त्याच्या हातांमध्ये आणि कल्पकला बुद्धीमध्ये ठासून भरली होती. आयुष्यभर बरीच मेहनत केल्यानंतर त्याने आता कामातून निवृत्ती घ्यायची असे ठरवले. असे म्हणून त्याने बिल्डरला काम थांबवत असल्याची सूचना दिली. बिल्डरने त्याची सूचना मान्यदेखील केली. परंतु एक अट घातली. निवृत्तीआधी एका वसाहतीत एक बंगला बांधायचा आहे. ते काम पूर्ण करून मग जा. 

कारागीर रागावला, परंतु त्याने राग व्यक्त केला नाही. तो ठीक आहे म्हणाला आणि त्याने कामाची सुरुवात केली. परंतु मनाने केव्हाच निवृत्त झालेला असल्याने त्याचे कामात लक्ष लागत नव्हते. रतीब टाकल्यासारखे त्याने काम पूर्ण केले आणि तीन चार महिन्यांनी बंगला बांधून बिल्डरचा निरोप घेतला. 

त्याची शेवटची कलाकृती पाहण्यासाठी बिल्डर त्या ठिकाणी गेला आणि त्याचा विश्वासच बसला नाही, की सुंदर वास्तू बांधणाऱ्या आपल्या कारागिराने हा ओबड धोबड बंगला बांधला आहे. बिल्डरने मनाशी ठरवल्याप्रमाणे त्या बंगल्याची चावी कारागिराला सुपूर्द केली आणि सांगितले, हा बंगला मी तुझ्यासाठी बांधून घेतला होता. तू आजवर सर्वांना आलिशान घर दिलेस त्या प्रामाणिकपणाचे आणि मेहनतीचे हे फळ!

कारागीर मनातून खजील झाला. मनातल्या मनात म्हणाला, हे जर आधी माहीत असते तर आजवर केलेल्या कामापेक्षा उत्तम काम करून मी माझे घर उभारले असते. परंतु माझी कामावरची श्रद्धा ढळली आणि त्याचे फळ मला असे मिळाले!

म्हणून काम संपवताना चालढकल करू नका. कारण प्रत्येक काम ही तुमच्या भविष्याच्या इमारतीसाठी रचलेली वीट असते. ती ढासळली, तर तुमचा स्वप्नांचा बंगला कोसळेल. म्हणून प्रेमाने काम करा आणि कामावर प्रेम करा. 

Web Title: Work with love and love work, only then will you get spectacular success!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.