World environment day 2022: 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या अभंगातून समजून घेऊया तुकोबारायांचा पर्यावरणविषयक दूरदृष्टीकोन!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 07:00 AM2022-06-04T07:00:00+5:302022-06-04T07:00:01+5:30

World environment day 2022: आपल्या संतांनी अणुरेणूसकट सर्व चराचराचा किती दूरदृष्टीने विचार केला होता हे या अभंगावरून कळते!

World environment day 2022: Let's understand Tukobara's environmental vision through the motto 'Vrikshavalli Amha Soyare'! | World environment day 2022: 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या अभंगातून समजून घेऊया तुकोबारायांचा पर्यावरणविषयक दूरदृष्टीकोन!

World environment day 2022: 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या अभंगातून समजून घेऊया तुकोबारायांचा पर्यावरणविषयक दूरदृष्टीकोन!

Next

लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी, यासाठी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु, वृक्षवल्ली अन्य कोणी नसून आपलेच सोयरे म्हणजे नातेवाईक आहेत, ही जाणीव आमच्या संतांनी, संस्कृतीने फार आधीपासूनच आमच्या मनात खोलवर रुजवली आहेत. म्हणूनच तुळशीची पूजा, शंकराला बेल, वडाला प्रदक्षिणा, मंगलकार्यात केळीचे खांब, जेवणानंतर गोविंदविडा इ. वृक्षवल्ली अर्थात पर्यावरणाशी निगडित गोष्टी आपल्या आयुष्याच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत. 

आपल्या संस्कृतीने नदीला पावित्र्य, पृथ्वीला मातृत्त्व, निसर्गाला पितृत्त्व, डोंगरदNयांना बंधुत्त्व बहाल करून मानवाची नाळ निसर्गाशी जोडलेली आहे. मातीतून जन्माला येत, मातीतच आपण मिसळणार आहोत याची जाणीव दिली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा विचार आपल्या मनात असतोच, फक्त त्याला खतपाणी घालण्यासाठी आजच्या दिवसाचे औचित्य!

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज तर अशा विशेष दिनाची वाट न पाहता वृक्षवल्लींशी थेट घरोबा करतात. शेवटी तेही संसारी माणूसच. संसारी व्यक्ती नातीगोती, प्रपंच, गणगोत याशिवाय राहू शकत नाही. परंतु संतांचा संसारही वेगळा. विषयासक्त नसलेला. म्हणून तर ते निसर्गाशी सोयरिक जोडून म्हणत आहेत,

वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे,
पक्षीही सुस्वरे आळविती।

नातेवाईक म्हटले की रुसवे फुगवे , कुरबुरी, राग मत्सर या गोष्टी आल्याच. परंतु तुकोबा रायांचे नातेवाईक सुस्वरात गातात, बोलतात, आनंदाने जगतात व दुसऱ्यांनाही आनंदाने जगायला शिकवतात. 

येणे सुखे रूचे एकान्ताचा वास,
नाही गुणदोष अंगा येत।

त्यांच्या सान्निध्यात येण्याने कपाळावर आठ्या येत नाहीत, तर सुखांताचा सहवास लाभतो. त्यांच्याशी बोलून मन रिते होते. गुणदोष अंगाला लागत नाहीत, उलट आत्मानंदाची अनुभूती होते.

आकाश मंडप पृथुवी आसन,
रमे तेथे मन क्रिडा करी।

या नातेवाईकांची श्रीमंती तर पहा, आकाश मंडप आणि पृथ्वी आसन आहे. भव्य-दीव्य महालच जणू. परंतु या श्रीमंतीचे मनावर दडपण येत नाही, उलट मन तिथे रमते, मुक्त होते.

कंथाकमंडलु देहउपचारा,
जाणवितो वारा अवसरू।

निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपल्या नेमक्या गरजा किती याची जाणीव होते. देहरक्षणापुरते कपडे आणि देहउपचाराकरिता पाण्याचा कमंडलू. बाकी गरजांची आठवणही होत नाही. वेळ-काळ याची भान राहत नाही. पण वाहता वारा आणि निसर्गाचे चक्र वेळेचे भान करून देतो.

हरिकथा भोजन परवडी विस्तार,
करोनि प्रकार सेवो रुचि।

या नातेवाईकांच्या गोतावळ्यात गेलो, की तहान भूक हरपून जाते. वृक्षवेली, वनचरे हरिकथा हेच भोजन म्हणून सेवन करतात आणि त्यांच्यामुळे आम्हालाही हरिकथेचे विविध प्रकार रुचकर वाटू लागतात.

तुका म्हणे होय मनासि संवाद,
आपुलाचि वाद आपणांसि।

आजही मानसिक स्वास्थ्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, हवापालट करा, असा वैद्यकिय सल्ला दिला जातो. काळापुढे जाऊन तुकाराम महाराज हेच पथ्य पाळायला सांगत आहेत. निसर्ग आपल्याशी बोलत नाही पण आपणच आपल्याशी संवाद साधायला शिकवतो. त्या एकांतात आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. मन:शांती मिळत़े म्हणून प्रापंचिक नातेवाईकांबरोबर वृक्षवेलींशी सोयरिक जुळवून घ्या आणि दरदिवस पर्यावरण दिवस म्हणून साजरा करा, हीच या अभंगाची फलश्रुती!

Web Title: World environment day 2022: Let's understand Tukobara's environmental vision through the motto 'Vrikshavalli Amha Soyare'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.