कर्जमुक्तीसाठी शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते हनुमंताची पूजा; वाचा विधी व मंत्रासह सविस्तर माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 08:00 AM2021-06-26T08:00:00+5:302021-06-26T08:00:02+5:30
हनुमानाची उपासना कोणी अध्यात्माच्या प्राप्तीसाठी करतं तर कोणी भौतिक सुखासाठी. ज्याची जशी भक्ती, तशी फलप्राप्ती होते.
हनुमान उपासनेची एक सर्वसामान्य पूजापद्धती ठरलेली आहे. उपासक आवश्यकतेप्रमाणे हनुमानाची दोन स्वरूपात उपासना करताना आढळतात. एक 'आपत्तीनिवारक वीररूप' आणि दुसरी `सुख-समृद्धी दासरूप.' वीररूपाची उपासना राजसोपचारांनी केली जाते. तर दासरूपाची सात्विक उपचारांनी.
हुमानाच्या उत्सवाच्या वेळी मूर्तीला पंचामृताने स्नान घालतात. तत्पूर्वी तिळाच्या तेलात शेंदूर मिसळून त्याचे मूर्तीच्या सर्वांगाला लेपन करतात. नित्य उपासनेच्या वेळी मात्र शुद्ध जलाने स्नान घातले जाते. केशराबरोबर रक्तचंदन उगाळून त्याचे गंध रेखतात. हनुमानाला शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाची आणि आकाराने मोठी फुले वाहतात.
प्रात:पूजनाच्या वेळी गूळ, नारळ आणि लाडू यांचा नैवेद्य दाखवावा. माध्यान्ही गूळ, तूप व गव्हाचा चुरमा किंवा रोट नैवेद्यासाठी तयार करावेत. सायंकाळी आंबा, केळी व पेरू हनुमानाला अर्पण करावेत.
चुरमा दररोज करणे शक्य नसेल, तर आठवड्यातून निदान मंगळवारी तरी अवश्य करावा. तोच प्रसाद भक्षण करून एकभुक्त राहावे. हे मंगळवारचे `भीमव्रत' मौन पाळून, डाव्या हाताने भोजन करून केले, तर सहा महिन्याचे आत व्यक्ती कर्जमुक्त होते.
तुपात भिजवलेल्या एक किंवा पाच वाती हनुमानपुढे प्रज्वलित कराव्यात. उत्सवाच्या वेळी ५,१०,५०, १०८ यापैकी शक्य होतील तेवढ्या वाती लावाव्यात. त्यावेळी शंख, घंटा, नगारा इ. वाद्ये वाजवावीत.
वाचिक (ज्यात उच्चारण ऐकू येईल असा), उपांशु (ओठ हालताना दिसतील पण शब्द ऐकू येणार नाही असा), मानसिक (मनोमन केला जाईल असा) त्रिवीध पद्धतीने हनुमानाच्या मंत्राचा जप केला जातो. या मंत्रजपाच्या वेळी ध्यानधारणाही तेवढीच महत्त्वाची आहे.
उद्यन्मार्तण्डकोटिप्रकटरुचियुक्तं चारुवीरा सनस्थं
मौज्जीवज्ञोपवीतारुणरुचिरशिखाशोभितं कुण्डलाङम
भक्तानामिष्टदं तं प्रणतमुनिजनं वेदनादप्रमोदं
ध्यायेद्देवं विधेयं प्लवंगकुलपतिं गोष्पदीभूतवार्धिम
हा श्लोक म्हणून उपासना पूर्ण करावी.