आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी विघ्नहर्ता बाप्पाची करा अशी उपासना!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 11:24 AM2022-05-23T11:24:39+5:302022-05-23T11:25:17+5:30
कोणत्याही मंगळवार पासून ही उपासना सुरु करता येते. तुम्हीही अनुभव घेऊन बघा!
सगळी सोंगं घेता येतील पण पैशांचं सोंग घेता येत नाही म्हणतात ते अगदी खरं आहे. स्वावलंबी होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतोच. अशा वेळी प्रयत्नांना उपासनेची जोड मिळाली तर समस्येतून समाधान मिळण्यास नक्की मदत होते. यासाठी विघ्न हर्त्या बाप्पाची उपासना कशी करावी ते जाणून घेऊया.
आपल्या देशात आधीच सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न होता, त्यात कोव्हीड काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कोणी रंकाचा राव झाला तर कोणी रावाचा रंक! तरीदेखील प्रत्येकाचे जगण्याचे युद्ध सुरूच आहे. रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नाला अध्यात्मिक शक्तीचे पाठबळ मिळावे, कोणत्याही एका मंगळवार पासून 'ॐ गं गौ गणपतये विघ्नविनाशने स्वाः' या गणेश मंत्राचा जप सुरू करा.
>> रोज सायंकाळी दिवेलागण झाल्यावर शांतचित्ताने बाप्पासमोर बसून मन एकाग्र करा. सांयकाळची वेळ शक्य नसेल तर जी वेळ तुमच्या सोयीची आहे ती एक वेळ ठरवून सलग महिनाभर ती वेळ उपासनेसाठी राखीव ठेवा.
>> बाप्पाला गंध लावून आणि फुल वाहून जपाला सुरुवात करा. महिलांना मासिक धर्म किंवा अन्य अडचणी असल्यास त्यांनी मनोमन गणेशाची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून उपासना सुरू करावी.
>> हा मंत्र रोज १००८ वेळा म्हणणे अपेक्षित आहे. परंतु वेळे अभावी ते शक्य नसेल तर किमान १०८ वेळा हा मंत्र जरूर म्हणावा.
>> मंत्र पठण झाल्यावर देवाला आपला मनोदय सांगून आपली मनोकामना पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना करावी.
>> मंत्र पठण केल्यामुळे किंवा जपाची माळ नित्यनेमाने ओढल्यामुळे प्रापंचिक त्रासातून काही क्षण मन स्थिर होते, विसावते. शांत मन चांगल्या कामासाठी प्रेरित करता येते. म्हणून मंत्रजप करावा असे सांगितले जाते.