यंदा नवरात्र आठ दिवसांचे; पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 08:17 AM2021-10-01T08:17:49+5:302021-10-01T08:18:43+5:30
यंदा ७ ॲाक्टोबरपासून घटस्थापनेला सुरुवात होत आहे.
मुंबई : यंदा ७ ॲाक्टोबरपासून घटस्थापनेला सुरुवात होत असून यावर्षी आश्विन शुक्ल चतुर्थी क्षयतिथी असल्याने नवरात्र आठच दिवसांची आली आहे. आठव्या दिवशी गुरुवार, १४ ॲाक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन आहे. त्याच दिवशी सरस्वती मूर्ती विसर्जन आहे, अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
निर्मितीशक्ती हीच आदिशक्ती आहे. हे विश्व १३.७ अब्ज वर्षांपूर्वी या निर्मितीशक्ती म्हणजे आदिशक्तीमुळेच निर्माण झाले. शेतातील रोपांवर धान्य तयार होते तेही या आदिशक्तीमुळेच. नवीन पिढी जन्माला येते तीही या निसर्गातील निर्मितीशक्तीमुळेच. म्हणून नवरात्र उत्सव हा या निर्मिती म्हणजे आदिशक्तीचा उत्सव असतो. नऊ हा अंक सर्व अंकांमध्ये मोठा आहे. नऊ ही ब्रह्मसंख्या समजली जाते. निर्मितीशक्ती आणि नऊ अंक यामध्ये एक नाते आहे. धान्य जमिनीत गेल्यावर नऊ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. नवरात्र हा निर्मितीशक्तीचा - आदिशक्तीचा उत्सव असल्याने नऊ दिवसांचा असतो, असेही पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
नवरात्रातील रंग
गुरुवार, दि. ७ ऑक्टोबर पिवळा
शुक्रवार, दि. ८ ऑक्टोबर हिरवा
शनिवार, दि. ९ ऑक्टोबर ग्रे
रविवार, दि. १० ऑक्टोबर केशरी
सोमवार, दि. ११ ऑक्टोबर सफेद
मंगळवार, दि. १२ ॲाक्टोबर लाल
बुधवार, दि. १३ ऑक्टोबर निळा
गुरुवार, दि. १४ ऑक्टोबर गुलाबी