तूचि एक आधार ! कोरोनाचं विघ्न दूर करुन पुन्हा 'सुखकर्ता दु:खहर्ता'चा जयघोष होऊ दे...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 01:23 PM2021-09-05T13:23:35+5:302021-09-05T13:24:39+5:30
हे महाराजा, तुझ्याच कृपेने कोरोना संकटाशी सामना करण्याचे सामर्थ्य आम्हास प्राप्त झाले होते. शास्त्रज्ञांनी कोरोना प्रतिबंधक लस तयार केली. त्यामुळे कोरोनाची लाट आटोक्यात येऊ लागली.
- दा. कृ. सोमण
विघ्नहर्ता गणरायाच्या उत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर जगावरचे कोरोनाचे हे संकट दूर होऊ दे. आमच्या संसाराची घडी पुन्हा नीट होऊन आर्थिक विवंचना दूर होऊ दे.. हे साकडे घालणारी गणपती बाप्पाला मारलेली आर्त हाक...
गणपती बाप्पा, आज मी तुला साकडे घालणार आहे. कारण तूच आमचा खरा आधार आहेस. आम्हाला माहीत आहे की, ‘आम्ही इथले मालक नाही आणि तू आमचा पाहुणाही नाहीस. खरं म्हटलं तर तूच या विश्वाचा मालक आहेस. आम्हीच पृथ्वीवर काही दिवसांपुरते आलेले पाहुणे आहोत.’ म्हणूनच तुला ही आर्त हाक मारीत आहोत. प्रार्थना करीत आहोत. नम्र विनवणी करीत आहोत.
हे ॐकार स्वरूप गणेशा, तुला नमस्कार असो. तूच प्रत्यक्ष ते तत्त्व आहेस. तूच केवळ कर्ता, धारण करणारा, विघ्ने नाहीशी करणारा आहेस. तूच खरोखर ते परब्रह्म आहेस. तूच साक्षात आत्मा आहेस.
हे बाप्पा, दरवर्षी न चुकता तू येतोस, आम्ही तुझे मोठ्या उत्साहात स्वागत करतो. तुझे षोड्शोपचारे पूजन करतो. तुझ्या स्तवनाची आरती करतो. भजन करतो. अथर्वशीर्षाचे पठणही करतो. तुला मंत्रपुष्पांजली अर्पण करतो. तुला आवडणाऱ्या मोदमयी मोदकांचा नैवेद्य अर्पण करतो. तुझ्या वास्तव्याने आम्ही आबालवृद्ध आनंदित होतो. जीवनातील दु:ख-चिंता सारेच विसरून जातो आणि अनंत चतुर्दशीचा दिवस येतो. तू आम्हाला आशीर्वाद देत आमचा निरोप घेतोस. तुझ्या विरहाने आम्ही खूप बेचैन होतो. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशी विनवणी करीत राहतो.
हे गणराया, दरवर्षी आम्ही तुझी भक्तिभावाने तन्मय होऊन सेवा करीत असतो; पण गणेशा, मागच्या वर्षी तुझ्या आगमनापूर्वीच संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले. तुझे स्वागत कसे करायचे? पूजा कशी करायची?आप्तेष्ट-मित्रमंडळींना तुझ्या दर्शनासाठी कसे बोलवायचे? मोठी चिंता लागून राहिली होती. कोरोनामुळे आम्ही बाहेर जाऊच शकत नव्हतो. आमच्यापैकी काहींच्या घरी माणसे आजारी होती. काहींच्या घरची माणसे तर कायमची दुरावली होती. काहींची नोकरी गेली होती. मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली.
हे गणेशा, तू दु:खहर्ता आहेस, तू सुखकर्ता आहेस, तू विघ्नहर्ता आहेस. मग कोरोनाचे हे महासंकट आमच्यावर का कोसळले? आमच्या हातून तुझी सेवा करण्यात काही चूक झाली का? अशी शंकाही आमच्या मनात आली. तरीही तुझ्यावरच्या प्रेमापोटी, श्रद्धेपोटी आम्ही आम्हाला सावरले. तूच दिलेल्या शक्तीमुळेच मागच्या वर्षी कोरोनाच्या महासंकटातही शिस्त व संयम पाळून आम्ही तुझे स्वागत केले. मिळेल त्या उपचाराने तुझे पूजन केले. निरोप देताना कोरोनाशी लढाई करून विजयी होण्यासाठी आशीर्वादही मागितला होता.
हे महाराजा, तुझ्याच कृपेने कोरोना संकटाशी सामना करण्याचे सामर्थ्य आम्हास प्राप्त झाले होते. शास्त्रज्ञांनी कोरोना प्रतिबंधक लस तयार केली. त्यामुळे कोरोनाची लाट आटोक्यात येऊ लागली. तरीही भीती ही आहेच. आमची मने धास्तावलेली आहेत. तू बुद्धिदाता आहेस. तूच आम्हाला मनोबल प्राप्त करून दे. हे विनायका, यावर्षी अशा भयग्रस्त मनाने आम्ही तुझे स्वागत करीत आहोत. आर्थिक ओढाताणीचे दिवस आले आहेत. कित्येकांचे रोजगार बंद झाले आहेत. कित्येकांच्या घरातील आप्तेष्ट कोरोनामुळे दुरावले आहेत. अनेक दिवस घरातच राहिल्याने आमची मने अस्वस्थ झाली आहेत. भविष्यकाळाची चिंता लागून राहिली आहे.
हे गौरीपुत्रा, आम्हाला तुझाच आधार आहे. तू विघ्नहर्ता आहेस. आमची विघ्ने तू दूर कर. तू दु:खहर्ता आहेस. आमची दु:खे दूर कर. तू सुखकर्ता आहेस. आम्हाला सुख प्राप्त होऊदे. तू वर्तमान, भूत आणि भविष्य काळाच्याही मर्यादेपलीकडील आहेस. तूच आमचा भविष्यकाळ उज्ज्वल कर. तू शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक शक्तींच्या ठिकाणी आहेस. तूच या शक्ती आम्हास प्राप्त करून दे. निर्मितीशक्ती, रक्षणशक्ती आणि संहारशक्ती ही तुझीच तीन रूपे आहेत. तूच सूर्य आहेस. तूच चंद्र आहेस. संपूर्ण निसर्ग तुझेच रूप आहे. नैसर्गिक संकटांपासून तूच आम्हास वाचवू शकतोस.
हे गणनायका, यावर्षी तुझ्याकडे हेच आमचे मागणे आहे. आमच्या हातून चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा कर. यावर्षी अशी प्रार्थना करीतच आम्ही तुझे स्वागत करीत आहोत, तुझी मनोभावे षोड्शोपचारे पूजा करीत आहोत. सर्व नियम व शिस्त पाळूनच तुझा उत्सव साजरा करीत आहोत. आमची सहनशीलता आता संपली आहे. आमचा आर्थिक डोलारा कोसळला आहे. संसाराची घडी पार विस्कटली आहे. देवाधिदेवा, तू हे सर्व जाणतोस, म्हणूनच तुला आमची कळकळीची ही विनंती आहे. जगावरचे कोरोनाचे हे संकट दूर होऊदे. आमच्या संसाराची घडी पुन्हा नीट होऊदे. आर्थिक विवंचना दूर होऊ दे. हेच आमचे मागणे आहे. हेच आमचे तुला साकडे आहे.
(लेखक पंचांगकर्ता आणि खगोल अभ्यासक आहेत.)