पिझ्झा, बर्गरसाठी वाटेल तेवढी देतो, मग गरिबाकडची जांभळं विकत घेताना वाटाघाटी का? वाचा ही गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 05:01 PM2022-02-18T17:01:20+5:302022-02-18T17:01:39+5:30
ही गोष्ट लक्षात ठेवून इथून पुढे प्रत्येक छोट्या व्यावसायिकाला जमेल तेवढा हातभार अवश्य लावा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ!
भाव केल्याशिवाय वस्तु खरेदीचे आपल्याला समाधान मिळत नाही. सगळेच विक्रेते कमाईच्या नादात अव्वाच्या सव्वा भाव लावत असतात, असा आपला समज असतो. परंतु, अनेकदा ओल्याबरोबर सुकंही जळतं...! आजही अनेक जण असे आहेत, जे प्रामाणिकपणे आपला व्यवसाय, नोकरी करत आहेत. परंतु या दुनियादारीच्या जात्यात तेही नाईलाजाने भरडले जातात, तेव्हा त्यांच्या मौनाला वाचा फुटते ती अशी...
नाशिकजवळचा सोमेश्वराचा सुंदर रम्य परिसर. भगवान शंकराचे देऊळ, नदीकिनारा, गाई-म्हशींचा गोठा, लोकवस्ती विरहित परिसर, निसर्गरम्य शांतता, मनाला आनंदी करणारे वातावरण. अशा वातावरण एक बाई आपल्या कुटुंबासहित सोमेश्वराचे दर्शन घेऊन आली. तिथला परिसर फिरत असतना तिला एका झाडापाशी टोपलीत जांभळं घेऊन बसलेली आजीबाई दिसली.
बाईला वाटले, चला आजीची बोहणी करून देऊ आणि सहपरिवार जांभळं खात परिसराचा आस्वाद घेऊ. बाई आजींजवळ आली. सवयीप्रमाणे तिने आजीला आधी जांभळांचा भाव विचारला. भाव विचारता विचारता एक जांभूळ तोंडात टाकले. आजी काही बोलली नाही. आजीने जांभळांचा भाव सांगितल्यावर बाई उखडली. दहा रुपयांचा एक वाटा घेण्यासाठी घासाघिस करू लागली.
जांभळांना चवच नाही, कीड लागलीये, महाग आहेत, धार्मिक स्थळी बसून तुम्ही लोक पर्यटकांना लुटता, विकत घ्यायची म्हटली तर साधा कागद नाही की पिशवी नाही. हे सगळे ऐकूनही आजी शांत होती.
बाईला जांभळं घ्यायची होती, पण आजीने किंमत कमी करावी अशी त्या बाईची अवाजवी अपेक्षा होती. आजी काहीच बोलली नाही. आजी बधत नाही पाहून बाईने रुमाल काढला आणि म्हणाली, द्या आता एक वाटा या रुमालात बांधून!
आजी एक वाटा उचलून रुमालात जांभळं देणार, तेवढ्यात बाईच्या लक्षात आलं आणि म्हणाली, 'नको नको, रुमालाला डाग पडतील.'
इतका वेळ शांत बसलेली आजी म्हणाली, 'रुमालाला पडलेले डाग जपता, पण इतका वेळ तुमच्या बोलण्याने माझ्या मनाला किती डाग पडले असतील याचा विचार केलात? माणसाने असे वागू नये. दुसऱ्याला दुखवण्यासारखे पाप नाही.'
आजीचा नम्र स्वर ऐकून खजिल झालेल्या बाईंचा चेहरा जांभळापेक्षा काळानिळा पडला. तिने आजींची क्षमा मागितली. आजीच्या बाजूला ठेवलेल्या तसबिरीतून शांत मुद्रेने सोमेश्वर हसत होता.
जी दुसऱ्यास दु:ख करी, ती अपवित्र वैखरी,
आपुलाची घात करी, कोणी येके प्रसंगी!