तंत्रविद्या न शिकताही तुम्हीदेखील चमत्कार घडवू शकता; कसा ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 05:49 PM2023-06-07T17:49:57+5:302023-06-07T17:50:45+5:30
सध्याच्या काळात चमत्काराशिवाय नमस्कार नाही, यासाठी तुम्हीदेखील चमत्कार घडवण्याची कला आत्मसात करून घ्या!
एका राजाला संतानप्राप्ती होत नसते, म्हणून तो हर तर्हेचे प्रयत्न करतो. एक दिवस एक तांत्रिक येऊन सांगतो, आपण जर एका लहान मुलाचा बळी दिला तर तुम्हाला संतानप्राप्ती होईल हे नक्की! हे ऐकून राजा संतान सुखासाठी वेडापिसा झाला. त्याने राज्यात दवंडी पिटवली. 'जो कोणी मला त्यांचे लहान मूल बळीसाठी देईल त्याला भरपूर सुवर्णमुद्रा देण्यात येतील.'
दवंडी ऐकून त्या राज्यातल्या एका दरिद्री माणसाने आपल्या चार मुलांपैकी सगळ्यात धाकटा मुलगा राजाला द्यायचा असे ठरवून टाकले. त्याच्या मोबदल्यात सुवर्ण मुद्रा मिळतील आणि आपले दारिद्रय दूर होईल असे तो स्वप्नं रंगवू लागला. साधारण पाच-सहा वर्षांच्या मुलाला घेऊन तो राजाकडे येतो आणि त्याच्या हाती सुपूर्द करतो. त्या मोबदल्यात ठरल्यानुसार राजा त्या दरिद्री माणसाला भरपूर सुवर्ण मोहरा देतो. तो आनंदाने घरी जातो.
लहान मुलाला न्हाऊ माखू घातले. छान कपडे दिले. भोजन दिले आणि मांत्रिकाने बळी देण्याचा दिवस ठरवला. त्याआधी त्या मुलाने राजाकडे थोड्या प्रमाणात वाळू मागवली. राजाने त्याची इच्छा पूर्ण केली. मुलाने त्या वाळूचे चार महाल बनवले. राजा आणि तो मांत्रिक मुलाकडे बघत होते. मुलाने एक एक करून तीन महाल बनवले आणि तोडले. नंतर तो चौथ्या महालासमोर डोळे मिटून बसला. काही वेळाने डोळे उघडले आणि राजाला म्हणाला, आता माझा बळी दिलात तरी हरकत नाही.
राजा आणि मांत्रिकाला आश्चर्य वाटले, या मुलाने नेमके केले तरी काय? मांत्रिकाला असेही वाटून गेले, की मुलालाही मांत्रिक विद्या येते की काय? दोघांनी विचारल्यावर मुलगा म्हणाला, ''मी हे चार महाल बनवले, त्यापैकी पहिला माझ्या माता पित्याचा होता. माझे जन्मदाते असूनही त्यांनी माझे रक्षण न करता बळी देण्यासाठी तुमच्या स्वाधीन केले. म्हणून मी त्यांच्या नावाचा महाल पाडला. दुसरा महाल या समाजाचा, ज्याने मला बळी प्रथेपासून वाचवले नाही तर दुर्लक्ष केले म्हणून त्यांचाही महाल पाडला. तिसरा महाल राजेसाहेब तुमचा होता, तोही मी मोडला. कारण प्रजेचे रक्षण करणे तुमचे कर्तव्य होते, मात्र तुम्हीच बळी द्यायला निघालात. म्हणून हा चौथा महाल देवाचा, आता त्याच्यावरच सगळा भार टाकून मी स्वतःला तुमच्या स्वाधीन करतोय.''
छोट्याशा मुलाचे ते बोल ऐकून राजा ओशाळला आणि त्याने विचार केला, आपण हे काय करायला चाललो होतो? आपल्याला संतान प्राप्ती व्हावी म्हणून दुसऱ्याच्या पुत्राचा बळी देणार होतो? त्यापेक्षा त्याच मुलाला दत्तक घेण्याचा विचार आपल्या मनात का बरे नाही आला? खजील होऊन राजाने मांत्रिकाला आपला निर्णय सांगितला आणि त्या मुलाला दत्तक घेतले व त्याला आपले मूल मानून त्याचा सांभाळ करायचा ठरवले.
थोडक्यात काय तर, आपली विवेक बुद्धी जागृत असेल तर आपल्याला संकटातूनही मार्ग काढता येतो आणि देवाची व दैवाची साथ मिळते. म्हणून संकटातूनही मार्ग काढण्याचा शेवट्पर्यंत प्रयत्न करत राहा, काय सांगावं त्यातून निघण्याचा मार्ग सहज सापडेलही!