तुम्ही-आम्ही खेळी मेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 05:07 AM2020-06-20T05:07:15+5:302020-06-20T05:07:23+5:30

लीला संकीर्तनात वेगवेगळ्या अवतारांतील ईश्वरी लीलांचा अंतर्भाव होतो. नाम संकीर्तनात नामाचा महिमा मुख्यत्वे असतो.

You-we play | तुम्ही-आम्ही खेळी मेळी

तुम्ही-आम्ही खेळी मेळी

googlenewsNext

- प्रा.डॉ. प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयक

गुण संकीर्तन, लीला संकीर्तन आणि नाम संकीर्तन या त्रिसूत्रीवर आधारित असलेले वारकरी कीर्तन नित्य आणि नैमित्तिक या दोन प्रकारांत सादर होते. गुण संकीर्तन म्हणजे परमेश्वराचा गुणानुवाद, तत्त्वचिंतन, त्याच्या सगुण-निर्गुणतेबद्दल चिंतन, त्याच्या व्यक्त, अव्यक्ततेबद्दल चिंतन. गुण संकीर्तन हे साधारणत: निरुपण प्रधान असते; तर लीला संकीर्तनात वेगवेगळ्या अवतारांतील ईश्वरी लीलांचा अंतर्भाव होतो. नाम संकीर्तनात नामाचा महिमा मुख्यत्वे असतो.

कोरोनाचे संकट नसते तर आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीपासून पुढे वाल्हे-लोणंद परिसरात असती. वाल्हे हे गाव वाल्ह्या कोळ्याचे अन् नंतर रामचरणी तल्लीन झालेल्या वाल्मीक ऋषींचे गाव. भारतीय संस्कृतीचे आणि लोकधर्माचे असे वैशिष्ट्य आहे, अनेक पुराणकथा वाऱ्याच्या वेगाने पसरल्या गेल्या व त्यांचे रूपांतर स्थान महिम्यात झाले. वाल्मीक ऋषींनी ‘राम’ आपलासा केला. त्याची कथा सांगताना वारकरी कीर्तनकार सांगतात, ‘बोलिले वाल्मिक तैसेचि करीन’.

वाल्ह्या कोळी मरा मरा म्हणताना पुढे राम राम म्हणू लागला. ‘राम म्हणता रामचि होईजे पदी बैसोनि पदवी घेईजे। राम रसाचिये चवी आन रस रुचति केवि’। रामजन्माच्या कीर्तनात वाल्मीक ऋषींचा महिमा सांगणाºया कीर्तनकारांची आठवण झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाल्ह्यात आल्यावर रामजन्माची कथा, निरूपण आठवते. ‘नाम संकीर्तन’ हा वारकरी संप्रदायाचा श्वास आणि ध्यास आहे. कुठल्याही संप्रदायाला प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट म्हणजे संप्रदायाला आराध्य दैवत आवश्यक असते. दुसरी या आराध्य देवतेची उपासना पद्धती आवश्यक असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रमाण ग्रंथ आवश्यक असतात. वारकरी संप्रदायाचे पंढरपूरचा श्री विठ्ठल हे आराध्य दैवत आहे. वारी आणि वारीतले कीर्तन ही उपासना पद्धती रूढ आहे आणि गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, संतांचे अभंग हे प्रमाण ग्रंथ आहेत.

‘नोहे एकल्याचा खेळ। अवघा मेळविला मेळ’ अशी संतांसह वारकरी समाजाची धारणा असते. ‘एकलिया भावबळे कै सापडे तो काळ’
त्यामुळेच ‘वैष्णवांच्या मेळे, उभा ठाके हाकेशी’ अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते हे केवळ संकीर्तन भक्तीने शक्य होते.
वीणेकरी हा वारकरी कीर्तनाचा अविभाज्य अंग असतो. किंबहुना सूत्रधार असतो. ‘वारकरी कीर्तनाच्या लहानात लहान आकाराला दिंडी म्हणतात. दिंडीचा प्रमुख हा वीणेकरी असतो. त्याच्या इशाºयाप्रमाणे बाकीचे लोक कुठला अभंग घ्यायचा हे ठरवितात, असे संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले. नित्य कीर्तन हे नेमाचे कीर्तन असून, त्यात एखादा चिंतनपर अथवा उपदेशपर अभंग घेतला जातो. नैमित्तिक कीर्तन हे रामजन्म, कृष्णजन्म, दत्तात्रयजन्म, हनुमानजन्म अशा स्वरूपाचे असून, त्यात लीला संकीर्तन होते.

Web Title: You-we play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.