अशी आलिशान गाडी तुमच्याकडेही असेल, फक्त संधीचे सोने करता आले पाहिजे; जसे या मुलाने केले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 05:38 PM2021-07-26T17:38:43+5:302021-07-26T17:39:38+5:30
आपणही अनेकदा चुका करतो. अभ्यास करतो पण परीक्षेला घाबरतो आणि परीक्षा दिली तरी निकाल बघायला घाबरतो. म्हणून प्रयत्नात कुचराई नको आणि संधी दवडणेही नको.
संधी मिळत नाही म्हणून माणूस रडत असतो, पण संधी ओळखता येत नाही, हे तो मान्य करत नाही. ती ओळखण्याची वेगळी अशी दृष्टी वगैरे नसते, तर प्रत्येक क्षणाचा बारकाईने विचार व मेहनतीची जोड देऊन काम केले तर आपोआप प्रत्येक क्षणाचे संधीत रूपांतर होते व संधीचे सोने करता येते. आता ही पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचीच कथा पहा ना...
पेट्रोलपंपावर काम करणारा एक मुलगा तिथे येणाऱ्या महागड्या गाड्या रोज निरखून पाहत असे. आज ना उद्या आपल्याकडेही अशी गाडी असेल असे स्वप्नरंजन करत असे.
एक दिवस तिथे खूप महागडी गाडी आली. ती पाहून त्याचे डोळे दिपून गेले. त्याने गाडीत पेट्रोल भरले व न राहवून भीत भीत त्या गाडीमालकाला विचारले, 'या गाडीची किंमत किती आहे साहेब?'
गाडीमालक म्हणाला, `ऐंशी लाख रुपए! का बरं?'
'साहेब, तुम्ही ही गाडी कशी विकत घेतलीत?' मुलाने निरागसपणे पुढचा प्रश्न विचारला.
गाडीमालक हसत म्हणाला, `कशी म्हणजे? कष्टाने विकत घेतली. मी सुद्धा एक साधारण माणूस होतो. पण जिद्दीने, मेहनतीने व्यवसाय वाढवत श्रीमंत झालो आणि ही गाडी विकत घेतली. तुलाही भविष्यात अशी गाडी घ्यायची असेल तर मला या नंबरवर फोन कर आणि एक दिवस भेटायला ये!'
असे म्हणत गाडीमालक भरधाव वेगाने निघून गेला. हातात व्हिजिटिंग कार्ड घेऊन तो मुलगा विचार करू लागला. पण त्याच्या मनात अनेक शंकांनी घर केले. त्याला वाटले, आपल्याला वाम मार्गाला लावले तर? हातून चुकीचे काम करून घेतले तर? मनाविरुद्ध वागावे लागले तर? नकोच हा विचार. असे म्हणत मुलाने ते कार्ड कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले.
दुसऱ्या दिवसापासून तो पुन्हा आपले काम करत तेच जुने स्वप्न उराशी बाळगू लागला. करता पाहता पाच वर्षे निघून गेली. एक दिवस त्याच्या पेट्रोलपंपावर पुन्हा एक महागडी गाडी आली. तो ती गाडी निरखू लागला. परंतु यंदा गाडीमालकाचा चेहरा त्याला ओळखीचा वाटला. त्याने नीट निरखून पाहिले आणि ओळख काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गाडीमालक म्हणाला, `मला ओळखले नाहीस? पाच वर्षांपूर्वी मी सुद्धा या पेट्रोलपंपावर सफाई कामगार म्हणून काम करत होतो. मी सुद्धा तुझ्यासारखे गाडीचे स्वप्न पाहत होतो. एक दिवस तुला त्या साहेबांशी बोलताना आणि नंतर ते कार्ड पेâकताना पाहिले. ते कार्ड नंतर मी उचलले आणि एक प्रयत्न करून पाहू असे म्हणत मी त्यांना भेटलो. छोट्या कामापासून सुरुवात झाली, खूप मेहनत घेतली आणि दोन महिन्यांपूर्वी ही गाडी विकत घेतली. त्या दिवशी तू सुद्धा जर ती संधी ओळखून किमान प्रयत्न केला असतास, तर आज तू सुद्धा अशाच आलिशान गाडीचा मालक असतास...!'
आपणही अशीच चूक अनेकदा करतो. अभ्यास करतो पण परीक्षेला घाबरतो आणि परीक्षा दिली तरी निकाल बघायला घाबरतो. म्हणून प्रयत्नात कुचराई नको आणि संधी दवडणेही नको. तरच तर संधीचे सोने नक्की होईल.