'पुढचे ३६५ दिवस मी आनंदातच राहणार आहे' हा असूदे तुमचा मुख्य संकल्प; तो पूर्ण कसा करायचा ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 03:21 PM2021-12-31T15:21:33+5:302021-12-31T15:21:56+5:30

ही वरवर सोपी वाटणारी पण प्रयत्नांती शक्य असणारी क्रिया ज्या दिवशीपासून जमेल, त्या दिवसापासून पुढचे ३६५ दिवस आनंदाचे सुरू होतील.

Your main resolve is 'I will be happy for the next 365 days'; Read on to find out how! | 'पुढचे ३६५ दिवस मी आनंदातच राहणार आहे' हा असूदे तुमचा मुख्य संकल्प; तो पूर्ण कसा करायचा ते वाचा!

'पुढचे ३६५ दिवस मी आनंदातच राहणार आहे' हा असूदे तुमचा मुख्य संकल्प; तो पूर्ण कसा करायचा ते वाचा!

googlenewsNext

जोवर तुमचा आनंद दुसऱ्यांमध्ये शोधत राहाल तोवर पुढचे वर्षच काय, तर आजन्म दुःखीच राहावे लागेल. याउलट स्वतःमध्ये आनंद शोधायला ज्या दिवसापासून सुरुवात कराल, त्या दिवसापासून उर्वरित आयुष्य आनंदातच घालवू शकाल. सुखी समाधानी आयुष्याचे हे साधे समीकरण आहे. आणि ते सोडवणे आपल्याच हातात आहे. हा गुंता सोडवायचा कसा आणि केवळ एक दोन दिवस नाही तर आयुष्यभर आनंदात कसे राहता येईल, यावर विचार आणि कृती करूया. 

नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या संकल्पाच्या यादीत स्वतःला आनंदी ठेवण्याला प्राधान्य द्या. जोवर तुम्ही आनंदी राहणार नाही तोवर तुम्ही दुसऱ्याला आनंद देऊ शकणार नाही. यासाठी आपण आधी आनंदात कसे राहायचे यावर थोडे चिंतन करू. 

आपल्या सभोवतालचे जग, माणसं, परिस्थिती बदलणे हे आपल्या हातात नाही. त्यांना बदलत बसलो तर आपले आयुष्य संपून जाईल. यासाठी बदलाची सुरुवात आपल्याला स्वतः पासून करावी लागेल. आपल्याला नको असलेले लोक, परिस्थिती वारंवार आपल्यासमोर येत राहणार. परंतु त्याच्याशी सामोरे कसे जायचे हे आपल्या हातात आहे. 

बाह्य परिस्थिती आपण बदलू शकलो नाही, तर आतली अर्थात मनातली परिस्थिती आपण सहज बदलू शकतो. त्यासाठी हवा आत्मसंवाद. ज्याप्रमाणे एखाद्याशी बोलल्यावर मन हलके होते, तसाच संवाद शांतपणे आपण आपल्याशी केला, तर आनंदाची कुपी आपल्याला सापडू शकेल. तटस्थपणे परिस्थितीचे अवलोकन करून आपण स्वतःशी संवाद साधला, तर अकारण काळजी करत असलेली परिस्थिती आपण गमतीशीरपणे पाहू शकतो. उदा. नोकरीवर बॉस, घरात बायको, नवरा, मुलं, सासू सासरे, नातेवाईक जे कोणी आपल्याला त्रास देतात किंवा ज्यांचा आपल्याला त्रास होतो, अशा लोकांकडे मनाच्या पातळीवर गमतीने बघायला शिका. मनातल्या मनात त्यांची टेर ओढली तरी त्यांना कळणार नाही, राग येणार नाही आणि आपल्याही रागाचा निचरा होऊन जाईल. एकदा राग गेला कि त्या व्यक्तीची, परिस्थितीची सकारात्मक बाजू आपण बघू शकू. 

स्वतःशी संवाद साधायचा आहे, तर तो चांगलाच संवाद साधायला हवा. संवाद म्हणजे विचार. आपले विचार सकारात्मक हवे असतील तर आपल्याला बाह्य रूपात धीर गंभीरपणे आणि अंतर्गत मनाला एखाद्या खोडकर मुलाप्रमाणे विषय हलका फुलका करता आला पाहिजे. 'मन चिंती ते वैरी न चित्ती', असे म्हणतात. मग मनात वाईट विचार आणायचेच कशाला? बाह्य जगात राग, लोभ, प्रेम सगळे काही केले तरी अंतर्गत मनाची शांतता अबाधित राहिली पाहिजे. 

यासाठी मनाच्या पातळीवर तटस्थ पणे परिस्थितीचे अवलोकन करा. त्या प्रसंगातली गंमत शोधून त्या क्षणाचा आनंद घ्या. ही वरवर सोपी वाटणारी पण प्रयत्नांती शक्य असणारी क्रिया ज्या दिवशीपासून जमेल, त्या दिवसापासून पुढचे ३६५ दिवस आनंदाचे सुरू होतील. नवीन वर्षाच्या आणि नवीन आयुष्याच्या शुभेच्छा!

Web Title: Your main resolve is 'I will be happy for the next 365 days'; Read on to find out how!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.