झेन कथा - चालेल, चालेल !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 03:21 AM2020-10-28T03:21:52+5:302020-10-28T03:22:21+5:30
Zen story : झेनसाधनेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही परिस्थितीत साधना होऊ शकते. सान सा निम जगभर झेनसाधनेचे शिबिरं भरवण्यासाठी फिरत असत. बरेच वेळा ते पोलंडमध्ये जायचे. पोलंडमध्ये जागा मिळणे कठीण असायचे. एकच खोली मिळायची.
- धनंजय जोशी
झेनसाधनेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही परिस्थितीत साधना होऊ शकते. सान सा निम जगभर झेनसाधनेचे शिबिरं भरवण्यासाठी फिरत असत. बरेच वेळा ते पोलंडमध्ये जायचे. पोलंडमध्ये जागा मिळणे कठीण असायचे. एकच खोली मिळायची. एकदा आमच्या शिबिराला एकच खोली मिळाली आणि साठ साधकांनी रजिस्ट्रेशन केलं. करणार काय? ध्यानासाठी बसायला जागा कुठे? तीन दिवसांचे शिबिर! मग सान सा निम म्हणाले, ‘काही हरकत नाही. आपण स्टँडिंग मेडिटेशन करूया!’ तीन दिवस सगळे साधक उभे राहून ध्यान करत राहिले. आणखी एकदा नव्वद दिवसांचे शिबिर होते. तेव्हा आमच्याकडे एक साधक होता; पण त्याला पाठीचा खूप त्रास होता. त्याला सरळ बसता होत नसे. सान सा निम त्याला म्हणाले, तू झोपून साधना कर. तो फक्त जेवण्यासाठी उठून बसायचा आणि नंतर इतर सर्व वेळी झोपलेल्या (म्हणजे खरे झोपलेल्या वेळी) किंवा आडवा पडून साधना करायचा.
माझ्या घरी मेडिटेशन सेंटर असताना शिबिरं व्हायची. तेव्हा आमच्याकडे एक ८६ वर्षांची साधक यायची. अर्थात, तिला ते अशक्य होते; पण ती उभे राहून अर्धे वाकून झेन नमस्कार घालायची. नंतर काही वर्षांनंतर ती हे जग सोडून गेल्यानंतर तिच्या अंतिम संस्कारासाठी तिच्या मुलीने मला बोलावले होते. तिच्या सांगण्यावरून. हे साधनेचे सामर्थ्य नाहीतर दुसरे काय?ध्यान करायला नुसते आसनावरती बसायला हवे असे नाही. उभे राहताना, चालताना, झोपलेले असताना, केव्हाही आपल्या मनाशी हा ध्यान संवाद विलक्षण लक्ष देऊन करू शकतो. आपल्याला अगदी साधी जागा, शांत जागा मिळालीच पाहिजे, असे कुणी सांगितले?
आणि एकदा हे समजले की भाजीत जरा मीठ कमी पडले, पोळी जरा कडक झाली, पुरी जरा जास्त तळली गेली, भात जरा खूप मऊ शिजला, तरी त्याच्याशी आपण म्हणू शकू, ‘चालेल, चालेल’. ती जे काही समोर येईल त्याला हो म्हणायची साधना!