झेन कथा - अपेक्षाभंगाची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 02:45 AM2020-10-31T02:45:48+5:302020-10-31T02:46:04+5:30
Zen story : तुमच्या जीवनामध्ये एक वेगळाच अर्थ शोधायचा असेल तर एका वेगळ्या मार्गावरून तुम्हाला चालावं लागेल. त्या मार्गाबद्दल मला सांगायचंय
- धनंजय जोशी
ग्रॅज्युएशन समारंभाला एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला आमंत्रण देऊन तिचं मुख्य भाषण ठेवण्याची अमेरिकेत प्रथा आहे. नव्या पदवीधरांना या भाषणातून सल्ला मिळतो, काही विनोदी आठवणी सांगितल्या जातात, एकंदरीत जरा करमणूकपण होते. झेन गुरुंना अशा भाषणांसाठी बोलावल्याची उदाहरणे जरा कमीच. स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झेन रोशी नॉर्मन फिशर यांनी २०१४ साली भाषण दिले होते. सरळ सत्य सांगितले तर ते झेन गुरु कसले? त्या भाषणातले काही भाग सांगण्यासारखे आहेत. कदाचित दोन किंवा तीन कथा लागतील सांगायला पण आपण बघूया ! ते म्हणाले, ‘मला इथे बोलावले हा माझा सन्मान; पण खरे म्हणजे मी नशीबवान आहे. कारण तुमच्या आयुष्यातल्या ह्या महत्त्वाच्या क्षणी मला तुमच्याबरोबर चिंतन करायची संधी मिळाली आहे. तर आपण ह्या क्षणाकडे लक्ष्य देऊया. कॉलेजचे वातावरण मला अगदी स्वर्गात गेल्यासारखे वाटते. अभ्यासाचे वातावरण, वेगवेगळ्या सुंदर इमारती, समोर येण्याऱ्या जीवनाबद्दलची उत्सुकता आणि आशा.. हे सगळे वाटते छान; पण सत्य सांगू?..
पुढे जे काही येणार आहे, ते सोपे नाही. तुम्ही हुशार आहात, तरुण आहात, तुम्हाला कदाचित यश मिळेल, कदाचित मिळणारही नाही. कदाचित खूप मोठे यश मिळेल; पण काहीतरी राहून गेले आहे असे तुम्हाला वाटत राहील. तुम्ही गोंधळून जाल. तुमचे वैयक्तिक जीवनही जसे हवे तसे मिळेलच असे नाही. मोठे होत जाल, तसतशी आजची आशा आणि उत्साह जपणे कठीण होत जाईल. तुमची आणि अपेक्षाभंगाची भेट होत जाईल, पण तेव्हा तुम्ही नोकरी-व्यवसायात बुडालेले असाल आणि अपेक्षाभंगाकडे लक्ष न देण्याचा प्रयत्न कराल - पण तो प्रयत्नच की ! आत्तापर्यंत जे तुम्ही शिकलात त्याच्यापेक्षा एक वेगळीच शिकवण तुम्हाला शिकायला लागेल.
तुमच्या जीवनामध्ये एक वेगळाच अर्थ शोधायचा असेल तर एका वेगळ्या मार्गावरून तुम्हाला चालावं लागेल. त्या मार्गाबद्दल मला सांगायचंय