पोळ्याच्या बाजारात करदोड्याचा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:17 AM2019-08-30T01:17:41+5:302019-08-30T01:18:35+5:30
बाजारात लहान-मोठ्या २५ हून अधिक दुकानांमध्ये बैलाचा साज विक्रीस उपलब्ध होता. यात दोर, वेसण, म्होरके, गोंडे, केसई, कांस्य, पितळ आणि तांब्याच्या धातूतील अलंकार विकले गेलेत. अलंकारामध्ये बैलाचे चार पायात घालायचे चार पैंजण ३५० रुपयांना विकले गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : गुरुवारी पोळ्याचा आदल्या दिवसाचा परतवाड्यातील बाजार रंगला. एरवी कंबरेला बांधायचा, नारळाला गुंडाळायचा नामशेष झालेल्या करदोड्याचीही बाजारात बऱ्यापैकी विक्री झाली.
बाजारात लहान-मोठ्या २५ हून अधिक दुकानांमध्ये बैलाचा साज विक्रीस उपलब्ध होता. यात दोर, वेसण, म्होरके, गोंडे, केसई, कांस्य, पितळ आणि तांब्याच्या धातूतील अलंकार विकले गेलेत. अलंकारामध्ये बैलाचे चार पायात घालायचे चार पैंजण ३५० रुपयांना विकले गेले. गळ्यातील घंटी, घोगवर, चाळजोड, घुंगरू, गळ्यातील गोफरूपी तोडा, वेगवेगळ्या आकारातील घुंगराचे साज, डोक्यावरील मंठाळी, कवड्यांची माळ, अंगावरील झुल यांसह सर्वच बाजारात उपलब्ध होते.
चामड्याच्या साहित्यात बेलडी, घुंगरपट्टा, वाढी, वादीची वीण, तर लोखंडामध्ये जुवाडीची शिव यांसह बैलजोडी व शेतीच्या अनुषंगाने वेगवेगळे साहित्य विकत घेण्यात आले. मेळघाटातील आदिवासी बांधवांचीही या बाजाराला गर्दी होती. वेगवेगळ्या रंगातील सुताचे दोर आणि दोरापासून बनविलेल्या साहित्याने बाजार उठून दिसत होता.