रेतीचे १० ट्रॅक्टर पकडले
By admin | Published: June 5, 2017 12:16 AM2017-06-05T00:16:06+5:302017-06-05T00:16:06+5:30
तामसवाडी (सि.) येथील वैनगंगा नदी पात्रातून रेतीचे अवैध खनन मागील अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरु आहे.
तामसवाडी घाटावर रेतीचे अवैध खनन : महसूल प्रशासाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह, नायब तहसीलदारांनी दोन ट्रॅक्टर सोडल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तामसवाडी (सि.) येथील वैनगंगा नदी पात्रातून रेतीचे अवैध खनन मागील अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरु आहे. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास डोंगरला सीतेपार रस्त्यावर रेतीचे १० ट्रॅक्टर नायब तहसीलदारांनी पकडले. या कारवाईने रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
तुमसर तालुक्यातील तामसवाडी (सि.) रेती घाट रेती करिता प्रसिद्ध आहे. सध्या हा रेती घाट महसूल प्रशासनाने बंद केला आहे. परंतु दररोज या रेती घाटावर रेतीचे अवैध उत्खनन मागील अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरुच आहे. यापूर्वीही महसूल प्रशासनाने येथे अनेक वेळा कारवाई केली. परंतु चोरटी रेती उत्खनन व वाहतूक सुरुच आहे.
रविवारी दुपारी ३ च्या सुमारास नायब तहसीलदार एन.पी. गौंड यांनी डोंगरला सीतेपार रस्त्यावर पाळत घेवून दहा अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. कारवाईकरिता तुमसर तहसील कार्यालयात ते जमा करण्यात आले. दरम्यान ट्रॅक्टर चालक व मालकांनी कारवाई दरम्यान दोन रेती ट्रॅक्टर नायब तहसीलदार एन.पी. गौंड यांनी सोडल्याचा आरोप केला आहे. त्या ट्रॅक्टरवरही कारवाईची मागणी ट्रॅक्टर चालक मालकांनी केली आहे.
शनिवारी तथा रविवारी शासकीय सुटीच्या दिवशी अवैध रेती उत्खनन तथा वाहतुकीला मोठा उत आला आहे. अधिकारी - कर्मचारी सुटीचा येथे अवैध रेती वाहून नेणारे फायदा उचलतात. दोनदिवसापूर्वी तहसील कार्यालयात जिल्हा खनिकर्म अधिकारी येऊन गेले होते. सध्या तुमसर तालुक्यातील जे रेती घाट बंद आहेत त्या रेती घाटावरून सर्रास रेतीचे अवैध उत्खनन सुरु आहे. येथे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शासनाच्या कोट्यवधींचा महसूल येथे बुडत असून तुमसर तालुक्यात रेती माफीयांचे रॅकेट सक्रीय आहे. महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय रेती उत्खनन व चोरटी वाहतूक शक्यच नाही हे विशेष.