बलात्कारप्रकरणी आरोपीला १० वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:38 AM2017-07-21T00:38:03+5:302017-07-21T00:38:03+5:30
विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने
प्रकरण भंडारा येथील : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एका ३२ वर्षीय आरोपीला १० वर्षांचा सश्रम कारावास व ३६ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अकिल अहमद वकील अहमद शेख, असे आरोपीचे नाव आहे. हा निकाल गुरूवारला दुपारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी दिला.
राजीव गांधी चौक परिसरातील रहिवासी असलेल्या अकील अहमद शेख याने १८ जून २०१३ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सदर महिला घरी असताना अकिलने महिलेला दुचाकीवर बसवून अन्य ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर सदर आरोपी महिलेच्या घरी वारंवार येऊन महिलेचे अश्लिल छायाचित्र व व्हिडीओ चित्रीकरण करून मोबाईल किंवा इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन महिलेला आपल्या मनाप्रमाणे वागवित होता.
याप्रकरणी कुणाशीही चर्चा केल्यास किंवा विरोध केल्यामुळे अकिलने महिलेला कुऱ्हाडीने आणि ब्लेडने चिरे मारून दुखापत केली. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पिडीत महिलेने भंडारा पोलीस ठाण्यात केली होती.
तपासाअंती पोलिसांनी अकिलविरूद्ध भादंवि ३७६ (२), ३६३, ३६६, ३२४ व ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. इंटरनेटच्या माध्यमातून महिलेची बदनामी केल्याचा कलमांतर्गतही अकिलवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. प्रकरण न्याय प्रविष्ठ झाल्यावर २५ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले कुऱ्हाड व अन्य पुरावे न्यायालयातसमोर हजर करण्यात आले. संपूर्ण प्रकरणाच्या सहानिशेनंतर जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी गुरूवारी अकिलला दोषी ठरवित विविध कलमांतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व ३६ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणाचा तपास अधिकारी पुडके यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते तर सहायक फौजदार किशोर ईलमकर यांनी प्रकरणाचा तपास केला होता. या प्रकरणी न्यायालयात सरकारी पक्षातर्फे अॅड.दुर्गा सुरेश तलमले यांनी बाजू मांडली.