भंडारा जिल्ह्यात १०० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:33 AM2021-02-14T04:33:22+5:302021-02-14T04:33:22+5:30
भंडारा : जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून सध्या केवळ १०० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, ...
भंडारा : जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून सध्या केवळ १०० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, शनिवारी १३ व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून १० नव्या रुग्णांची भर पडली.
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २२ हजार ९५२ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात १३ हजार ३५५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी १२ हजार ९२९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. तर, ३२६ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येत घट येत असल्याचे दिसत आहे.
शनिवारी ४६४ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने घेण्यात आले. त्यात लाखनी तालुक्यात सात, भंडारा दोन आणि साकोली तालुक्यात एक कोरोना रुग्ण आढळून आला. लाखांदूर, पवनी, तुमसर आणि मोहाडी तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही. शनिवारी कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. सध्या जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून त्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट आल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याला नागरिकांचे सहकार्य आहे.