संचारबंदीच्या काळात १० हजार पाॅझिटिव्ह; १५ दिवसांनंतर रुग्णसंख्या झाली कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:57 AM2021-05-05T04:57:25+5:302021-05-05T04:57:25+5:30
भंडारा : पहिल्या लाटेच्या तुलनेने दुसऱ्या लाटेत अनेक रेकाॅर्ड ब्रेक झाले. अवघ्या महिनाभरातच हजारो रुग्ण बाधित झाले, तर मृत्यूसंख्याही ...
भंडारा : पहिल्या लाटेच्या तुलनेने दुसऱ्या लाटेत अनेक रेकाॅर्ड ब्रेक झाले. अवघ्या महिनाभरातच हजारो रुग्ण बाधित झाले, तर मृत्यूसंख्याही झपाट्याने वाढली. विशेष म्हणजे संचारबंदीच्या काळात तब्बल १० हजार रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. उल्लेखनीय म्हणजे १५ दिवसांनंतर रुग्णसंख्या थोड्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले. यात एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. १५ एप्रिलपासून संचारबंदी घोषित झाल्यापासून रुग्णसंख्या सातत्याने वाढतच होती. दरम्यान, २८ एप्रिलनंतर रुग्णसंख्येत थोडीफार घट जाणवायला लागली. मात्र, मृत्यूसंख्येत घट दिसून आली नाही; परंतु गत दोन दिवसांत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचीही तक्रार समोर येत असताना विनाकारण घराबाहेर पडणे हेच कोरोना संसर्ग पसरण्याचे मुख्य कारण ठरत आहे.
यामुळे घटली संख्या
गत २० दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र, संचारबंदीच्या शेवटच्या टप्प्यात रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने टक्केवारीतही वाढ झाली आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून मृत्यूचा ग्राफही कमी झाल्याचे दिसून येते. संचारबंदीत नियमांचे पालन झाल्यानेच संख्या घटत असल्याचे जाणवते.
ग्रामीण भागात रुग्ण
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यापेक्षा यावेळेस ग्रामीण भागात रुग्णसंख्या अधिक असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील ७८४ गावांपैकी ७०० गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याची आकडेवारी आरोग्य विभागाने घेतली आहे. नियमांना तिलांजली दिल्यानेच ग्रामीण भागातही याचा मोठ्या झपाट्याने फैलाव झाल्याचे दिसून आले. यामुळेच ग्रामीण भागातही चिंतेचे वातावरण दिसत आहे.