१०८ अॅम्बुलन्सची दोन लाखांवर रुग्णसेवा
By admin | Published: July 1, 2017 12:29 AM2017-07-01T00:29:31+5:302017-07-01T00:29:31+5:30
संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या १०८ अॅम्ब्युलन्स सेवेने रुग्णसेवेचा उच्चांक गाठला आहे.
एका क्लिकवर मदत : जनतेला प्रोत्साहित करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
हितेश रहांगडाले । लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या १०८ अॅम्ब्युलन्स सेवेने रुग्णसेवेचा उच्चांक गाठला आहे. यशस्वी मार्गक्रमण करीत नागपूर विभागात या सेवेने दोन लाखाहून अधिक रुग्णांना सेवा दिल्याचे वास्तव पुढे आले आहे.
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस प्रोजेक्ट अंतर्गत बीव्हीजी इंडिया मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात १०८ अॅम्ब्युलन्स सेवेची सुरुवात करण्यात आली. १ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेने अवघ्या तीन वर्षाच्या अल्पकाळात दोन लाखांहून अधिक रुग्णांना सेवा पुरविण्यात आली आहे.
सदर सेवेंतर्गत बेसीक लाईफ स्पोर्ट (बीएलएस) व अॅडव्हांस लाईफ स्पोर्ट (एएलएस) अशा दोन प्रकारच्या अॅम्ब्युलॅन्स सेवा पुरविण्यात आल्या असून संपूर्ण राज्यात ९३७ अॅम्ब्युलॅन्स सेवा देत आहेत. सदर सेवा पूर्णत: नि:शुल्क असून १०८ या टोल फ्री क्रमांकाद्वारे या सेवेचा लाभ गरजूला घेता येतो. एवढेच नव्हे तर सदर सेवेने अलीकडेच मोबाईल अॅप सुरू केले आहे. त्यामुळे सदर अॅपद्वारे एका क्लिकवर गरजूला मदत मिळू शकते. यासाठी रुग्णाचा पत्ता सांगण्याची गरजही पडत नाही.
नागपूर विभागात १०८ अॅम्ब्युलॅन्स कार्यरत आहेत. गोंदिया जिल्ह्यात १३, भंडारा ११, नागपूर ४२, वर्धा ११, चंद्रपूर २१, गडचिरोली १० याप्रमाणे १०८ अॅम्ब्युलॅन्स सेवा देत आहेत.
१०८ अॅम्बुलन्स सेवेच्या तत्परतेने सर्वच नागरिक समाधानी असून गरजंूना वाहन व आरोग्य सेवा एकाचवेळी सहज व मोफत उपलब्ध होत आहे.
मार्च २०१४ पासून सुरू झालेल्या १०८ अॅम्ब्युलन्स सेवेचे अगदी कार्य अगदी धडाडीने सुरू आहे. मागील तीन वर्षात अॅम्ब्युलॅन्स सेवेचा आकडा दोन लाखाच्या जवळपास पोहोचलेला आहे.
सदर सेवा गरजू रुग्णांकरिता सहज व मोफत असून जनतेने याचा लाभ घेण्याकरिता पोलीस पाटील, तलाठी, पदाधिकारी व सुशिक्षितांनी जनतेला प्रोत्साहित करण्याचे आवाहन आरोग्य विभाग व शासनाच्यावतीने करण्यात आले आहे.