‘१०८’ने वाचविले १३ हजार रूग्णांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2016 12:15 AM2016-08-20T00:15:42+5:302016-08-20T00:15:42+5:30
तातडीचा प्रसंग उद्भवल्यानंतर रुग्णाला पहिल्या तासात वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी,...
उपक्रम शासनाचा : रूग्णवाहिकांची भूमिका महत्त्वाची
संजय साठवणे भंडारा
तातडीचा प्रसंग उद्भवल्यानंतर रुग्णाला पहिल्या तासात वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, आपातकालीन स्थितीत एकही जण उपचाराविना दगावता कामा नय, वेळेवर नजीकच्या शासकीय रुग्णालयात रुग्ण पोहचावे याकरिता राज्य शासनाने महाराष्ट्र आपातकालीन वैद्यकीय सेवा सुरु केली. या अनुषंगाने राज्यात १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत दोन वर्षात जिल्ह्यात १३ हजार ५१७ रुग्णांचा जीव वाचविण्यात यश मिळाले आहे.
भंडारा जिल्ह्याच्या सेवेत सध्या अकरा रुग्णवाहिका कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्यात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सुरु केल्या. २६ जानेवारी २०१४ ला हा प्रकल्प सुरु झाला.
त्यासाठी पुणे येथील भारत विकास प्रतिष्ठानला ही जबाबदारी सोपविण्यात आली. या रुग्णवाहिका दोन प्रवर्गात सुरु झाल्या. त्यात बेसीक लाईफ सपोर्ट आणि अॅडव्हांस लाईफ सपोर्ट या दोन स्वरुपाच्या रुग्णवाहिकांचा समावेश आहे.
पहिल्या प्रकारच्या रुग्णवाहिकेत अतीदक्षता विभागाप्रमाणे पल्स आॅक्समिटर, सर्पदंश झाला असेल तर विषरोधक सलाईन अशा उपकरणांचा समावेश असतो. अॅडव्हांस स्वरुपाच्या रुग्णवाहिकेत आणखी चार अद्यावत उपकरणाचा समावेश असतो. यात प्रामुख्याने वरील उपकरणासोबतच ईसीजी, मॉनीटर, हृदयाची स्पंदने सुरु करण्यासाठी शॉक मशीन, व्हेंटीलेटर, व्हॉलोमेथीक पंप, प्राण वाचविणाऱ्या औषधांचा समावेश असतो. चार प्रकारचे स्ट्रेचरही असतात. शिवाय एखाद्या गरोदर मातेला रुग्णालयाच्या वाटेतच प्रसुतीकळा आल्या तर तिचे बाळंतपण रुग्णवाहिकेत करता यावे याकरिता प्रसुतीगृहातल्या सुविधादेखील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
याच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची नागपूर विभागाची आकडेवारी लक्षात घेतली तर या विभागात ही सुविधा झाल्यापासून आतापर्यंत १ लक्ष १३ हजार जणांचे प्राण वाचविण्यात आरोग्य विभागाला यश मिळाल्याची माहिती आहे. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा अशी ६ जिल्हे येतात. या अंतर्गत एकट्या नागपूर जिल्ह्यात ४२, चंद्रपूर जिल्ह्यात १६, गोंदिया १३, वर्धा ११ तर गडचिरोली जिल्ह्यात ९ रुग्णवाहिकांचा समावेश आहे.