ड्रिप व मल्चींगवर ४ एकरात ११ लाखाचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:28 AM2020-12-26T04:28:27+5:302020-12-26T04:28:27+5:30
सहा महिन्यात ३ लाख खर्च, ८ लाखाचा नफा, ढिवरवाडा येथील उद्योनमुख शेतकऱ्याची यशोगाथा युवराज गोमासे करडी(पालोरा): मोहाडी कृषी ...
सहा महिन्यात ३ लाख खर्च, ८ लाखाचा नफा, ढिवरवाडा येथील उद्योनमुख शेतकऱ्याची यशोगाथा
युवराज गोमासे
करडी(पालोरा): मोहाडी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात विहिर, अनुदानावर ४ एकरात ड्रीप व मल्चींग बसविले. वैनगंगा नदीकाठावरील काळया कसदार शेतात कुटूंबासह ढोर मेहनत केली. शेताचे सपाटीकरण, खत, औषधी व पाण्याचे तंत्रशुद्ध नियोजन केले. जुलै महिन्यात २ एकरात वांगे, १ एकरात चवळी, २ एकरात कोहळयाची लागवड केली. सहा महिन्यात ११ लाखाचे उत्पादन विकले. ३ लाखाचा खर्च वजा जाता ८ लाखाचा नफा मिळाला. अजुनही उत्पादन सुरू आहे. ही यशोगाथा आहे, ढिवरवाडा येथील उद्योनमुख शेतकरी श्रीकृष्ण वातू वनवे (४३) रा. ढिवरवाडा यांची.
श्रीकृष्ण वनवे यांनी मोहाडी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, आत्मा प्रकल्पाच्या बोरकर मॅडम, करडीचे कृषी पर्यवेक्षक एम.जे. सेलोकर व कृषी सहाय्यक सुरेश हटेकर यांच्या मार्गदर्शनात योजनेंतर्गत उन्हाळयात विहिर खोदली. अनुदानावर ४ एकरात साकोली येथील व्यावसायिकाडून ड्रीप व मल्चींग बसविले. जुलै महिन्यात वांगे, कोहळा व चवळी पिकांची लागवड केली. सेंद्रिय, जैविक व रासायनिक खत, पाणी व वेळोवेळी औषधांची फवारणीचे नियोजन केले. आठवडयातील प्रत्येक तोळा ४ टन उत्पादनाचा हाती पडला. अतिशय कमी खर्चात १० ते १५ किलो पर्यंत कोहळयाचे पीक बहरले. सहा महिन्यात कोहळयाचे दोनदा पीक घेतले. कमी खर्चात चवळीचे चांगले उत्पादन मिळाले. भंडारा व गोंदिया शहरात सुरुवातीला वाग्याला ३५ रूपयांपर्यंत भाव मिळाला तर सध्या ठोक भाव १० रूपये मिळत आहे. कोहळयास सुरूवातीला १८ रूपये, सध्या १० ते १२ रूपयांचा भाव तर चवळीस सुरुवातीला ३० रूपयांचा भाव मिळाला. सहा महिन्यात वांग्यापासून ८ लाख, दोनदा घेतलेल्या कोहळयापासून ४ लाख तर चवळीपासून १ लाखाच्या उत्पादनाची विक्री करण्यात आली. तिन्ही पिकापासून ११ लाखाचे उत्पन्न मिळाले. सहा महिन्यात मशागत, मजुरी, ड्रीप व मल्चींग आदींवर सुमारे ३ लाखाचा खर्च झाला असून सहा महिन्यात ४ एकरात ८ लाखाचा नफा मिळाला आहे.
अशी मिळाली प्रेरणा
श्रीकृष्णा वनवे यांच्याकडे ८.५० एकर शेती असून वर्षभरापूर्वी ते पारंपारिक पद्धतीने धान, वागे, टमाटर, मिरची, हरभरा आदी पिकांची लागवड करायचे. परंतू कुटूंबाचा उदरनिर्वाह होईल, ऐवढेच उत्पादन हाती पडायचे.
बऱ्याचदा शेतीतून लागवडीचा खर्च भागत नव्हता. मोहाडी कृषी विभागाचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी किशोर पाथ्रीकर यांच्या आग्रहाखातर शेतकरी सहलीचे माध्यमातून छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील शेतीची पाहणी केली. तेथील शेतक-यांनी तत्रज्ञान व आधुनिक पद्धतीच्या शेतीतून साधलेली प्रगती पाहून ते प्रभावीत झाले.
ड्रीप व मल्चींगवर झालेला खर्च
श्रीकृष्ण वनवे यांना ४ एकरासाठी ड्रिपकरीता १.७५ लाख, मल्चींगसाठी ५० हजार रूपयांचा खर्च लागला. झालेला खर्च पहिल्याच उत्पादानातून निघाल्याचे समाधान वनवे यांनी व्यक्त केले आहे. पारंपारिक शेतीत उत्पादन अत्यल्प आल्याने उर्वरीत ४.५० एकरातही कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ड्रीप व मल्चींगवर शेती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
कोहळयाची शेती फायद्याची
कोहळयाचे पीक अल्पकाळात येणारे असले तरी जास्त पैसे देणारे आहे. सहा महिन्यात दोनदा पीक घेतल्यानंतर त्यांनी आता डिसेंबर महिन्यात पुन्हा अडीच एकरात कोहळा पिकाची लागवड केली असून पीक जोमदार आले आहे.