तालुक्यातील ११ तलाठी कार्यालये भाड्याच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:41 AM2021-09-24T04:41:25+5:302021-09-24T04:41:25+5:30
लाखांदूर : शासन व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने मागील अनेक वर्षापासून महसूल प्रशासनातील अत्यंत महत्त्वपूर्ण समजले जाणारे तलाठी कार्यालयांचे बांधकाम ...
लाखांदूर : शासन व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने मागील अनेक वर्षापासून महसूल प्रशासनातील अत्यंत महत्त्वपूर्ण समजले जाणारे तलाठी कार्यालयांचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे तालुक्यातील ११ तलाठी कार्यालये इमारतीअभावी मागील अनेक वर्षापासून जवळपास २०० ते ३०० रुपये भाड्याने खाजगी घरात सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदरची माहिती लाखांदूर तहसील कार्यालयाअंतर्गत देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, महसूल प्रशासनाअंतर्गत तलाठी कार्यालयाला ग्रामीण भागात महत्त्वपूर्ण स्थान आहे. महत्त्वपूर्ण स्थान आहे शेतजमिनीसह अन्य विविध शासकिय, निमशासकीय व खासगी कामकाजासाठी या तलाठी कार्यालयातून नागरिकांना विविध प्रमाणपत्र व महसूलविषयक अभिलेख उपलब्ध केले जातात. लाखांदूर तालुक्यात २५ तलाठी साझा कार्यालये आहेत. मात्र या तलाठी साझा कार्यालयांपैकी केवळ १४ तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम शासनाद्वारे केले आहे तर उर्वरीत ११ तलाठी कार्यालये मागील अनेक वर्षांपासून खासगी भाड्याच्या घरात सुरू असल्याची माहिती आहे.
बॉक्स
या साझ्यांचा समावेश
खासगी भाड्याच्या घरात सुरू असलेल्या तलाठी कार्यालयाचे संबंधित घरमालकाला दरमहा २०० ते ३०० रुपये भाडे दिले जात असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान भाड्याच्या घरात सुरू असलेल्या तलाठी कार्यालयांत पिंपळगाव को, चप्राड, विरली (खु), किरमटी, मोहरणा, सोनेगाव, तई (बु), मांढळ, बेलाटी, तावशी व ओपारा आदी तलाठी साझ्यांचा समावेश आहे. तलाठी कार्यालयाचे इमारत बांधकामासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांतर्फे केली जात आहे.