झोपेतच सर्पदंश, ११ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 04:59 PM2023-08-04T16:59:34+5:302023-08-04T17:02:23+5:30
तुमसर तालुक्यातील नवरगाव येथील घटना
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : कुटुंबीयांसह रात्री जेवण करून घरात आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या ११ वर्षीय मुलीला झोपेतच सापाने चावा घेतला. यानंतर उपचारासाठी तातडीने भंडारा आणि नागपूर गाठूनही अखेर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना तुमसर तालुक्यातील नवरगाव येथे ३ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली.
मोनाली श्रीधर गुर्वे असे या मुलीचे नाव आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ती सहाव्या वर्गात शिकायची. ३ ऑगस्टच्या रात्री आई-वडील आणि भावंडांसोबत जेवण करून सर्वजण झोपी गेले होते. आई आणि तीन मुली जमिनीवर अंथरूण घालून झोपल्या होत्या. दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सापाने कडाडून चावा घेतल्याने मोनाली ओरडायला लागली. यामुळे कुटुंबीय जागे झाले. यावेळी पाहिले असता मण्यार या अतिविषारी सापाने तिला चावा घेतल्याचे लक्षात आले.
जराही वेळ न घालवता आई-वडिलांनी मोनालीला तुमसर येथील शासकीय दवाखान्यात आणले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. प्रकृती अधिकच खालावत चालल्याने तिला डॉक्टरांच्या सल्लानुसार पहाटे नागपूर येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र, तिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मोनाली वर्गात होती हुशार
सहाव्या वर्गात शिकणारी मोनाली वर्गातील हुशार विद्यार्थिनी होती. तिच्या पश्चात एक भाऊ व तीन बहिणी आहेत. गोंडस आणि सालस स्वभावाच्या मोनालीच्या अकाली मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी दुपारी गावच्या स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.