जिल्ह्यातील 11199 महिला कोरोना लसीकरणात पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:34+5:302021-07-22T04:22:34+5:30
गोंदिया : जिल्ह्यात लसीकरणाला आता गती येत असताना दिसत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील लसीकरणाने पाच लाखांचा टप्पा ...
गोंदिया : जिल्ह्यात लसीकरणाला आता गती येत असताना दिसत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील लसीकरणाने पाच लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, रविवारपर्यंत (दि.१८) जिल्ह्यात ५३२४१३ नागरिकांचे लसीकरण झाल्याची नोंद घेण्यात आली असून, यामध्ये १११९९ महिला पुरुषांच्या तुलनेत पुढे असल्याचे दिसले. यातून महिला लसीकरणात पुरुषांच्या पुढे असल्याचे दिसत असून, हा फरक दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.
१६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात अगोदर पुरुषांची संख्या जास्त होती. परिणामी महिला लसीकरणाला घाबरत असल्याचे वाटत होते. शिवाय लसीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत नव्हते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आली व चांगलाच कहर झाल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली होती. परिणामी लसीकरणाशिवाय उपाय नाही हे सर्वांच्या लक्षात आले व लसीकरणासाठी नागरिक पुढे येत असल्याचे दिसत आहे. यात विशेष बाब म्हणजे, महिला आता लसीकरणासाठी सरसावल्या असून, त्यांनी पुरुषांना मागे टाकले आहे.
जिल्ह्यातील लसीकरणाची रविवारपर्यंतची आकडेवारी बघता ५३२४१३ नागरिकांचे लसीकरण झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये ४२५४९१ नागरिकांनी पहिला डोस, तर १०६९२२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाच्या या आकडेवारीत २७१८०६ महिला असून, २६०६०७ पुरुष आहेत. म्हणजेच, पुरुषांच्या तुलनेत तब्बल १११९९ महिला लसीकरणात जास्त असल्याचे दिसून येत आहे.
वाढतच चालली फरकाची आकडेवारी
जिल्ह्यातील महिला लसीकरणात पुढे असल्याची नोंद राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. त्यात आता महिलांच्या फरकाची आकडेवारी सातत्याने वाढत असल्याचेही दिसत आहे. त्याचे असे की, ५ जुलै रोजी २३२९७२ पुरुषांचे लसीकरण झाले असतानाच २३३२३६ महिलांचे लसीकरण झाले होते. म्हणजेच, २६४ महिला पुढे होत्या, तर १४ जुलै रोजी २५८६५० महिलांचे लसीकरण झाले असतानाच २५३३०४ पुरुषांचे लसीकरण झाले होते. म्हणजेच, ५३४६ महिला पुढे होत्या. त्यानंतर १८ जुलै रोजी २७१८०६ महिलांचे लसीकरण झाले असून, २६०६०७ पुरुषांचे लसीकरण झाले आहे. म्हणजेच, येथे फरक आणखी वाढला असून १११९९ महिला पुढे होत्या.