जलयुक्तच्या २३८ कामांवर १.१६ कोटींचा खर्च
By admin | Published: June 17, 2017 12:23 AM2017-06-17T00:23:13+5:302017-06-17T00:23:13+5:30
सन २०१६-१७ यावर्षात मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ३५१ कामे विविध विभागांमार्फत प्रस्तावित करण्यात आली होती.
७५ कामे अपूर्ण : ९८ हेक्टरला होणार सिंचनाचा लाभ
युवराज गोमासे । लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : सन २०१६-१७ यावर्षात मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ३५१ कामे विविध विभागांमार्फत प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी एकूण ३८ कामे वर्षभरात सुरू केली नाही. तर ४० कामे रद्द करण्यात आली. ३१३ कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी २३८ कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आली. तर उर्वरित ७५ कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण झालेल्या कामांवर १ कोटी १६ लक्ष ५ हजार १७५ रूपयांचा खर्च झाला असून ९८.७ हेक्टर क्षेत्राला ओलीताची सोय सन २०१७-१८ मध्ये होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
जलयुक्त शिवार या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये एकूण १० गावे समाविष्ट होती. गावांमध्ये मुलभूत ओलीतांच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी कृषी विभाग मोहाडी, पंचायत समिती, जि.प. लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा, वनविभाग, पेंच व्यवस्थापन, भुजन सर्व्हेक्षण आदी विभागाने कामे केली गेली. कृषी विभागाअंतर्गत चार शेततळे पूर्ण झाली. १० दिवसापैकी ६ कामे पुर्ण झाली. चार प्रगतीपथावर आहेत. सहा सिमेंट बंधारा दुरूस्तीपैकी दोन कामे पूर्ण तर चार कामे पूर्ण होण्याच्या टप्यात आहेत.
मोहाडी पं.स. अंतर्गत मजगीची चार कामे करण्यात आली. मजगी पुनर्जिवनाची १३५ कामापैकी १०३ कामे पूर्ण झाली तर ३२ कामे प्रगतीपथावर आहेत. एकूण १३९ कामापैकी १०७ कामे पूर्ण तर ३२ कामे अपूर्ण आहेत. यावर ४०,५५,०९५ लक्ष रूपयांचा खर्च होवून ३१.४५ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. जि.प. लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा अंतर्गत सिनाबाची सात कामे पूर्ण झाली.
साठवण बंधाऱ्यांच्या पाच कामापैकी एक काम पूर्ण होवून चार कामे अपूर्ण आहेत. साठवण बंधारा दुरूस्ती व खोलीकरणाची सहा पैकी चार कामे पूर्ण तर दोन कामे प्रगतीपथावर आहेत. केटीवेअर दुरूस्तीचे पाच पैकी एक काम पूर्ण तर चार कामे अपूर्ण आहेत. मामा तलाव दुरूस्तीची सात कामे अपूर्ण आहेत. एकूण ३० कामापैकी सहा कामे पूर्ण तर २४ कामे अपूर्ण आहेत यावर आतापर्यंत फक्त दोन लाख सहा हजाराचा खर्च झालेला आहे.
सामाजिक वनीकरण,
लघु पाटबंधारे नापास
सन २०१६-१७ वर्षात सामाजिक वनकरण विभागाचे वतीने नियोजनाच्या आखाड्यात वृक्ष लागवडीचे फक्त एक काम प्रस्तावित करण्यात आले होते. तर पाटबंधारे श्रेणी एकच्या वतीने कालवा दुरूस्तीचे दोन व लपा तलाव दुरूस्तीचे एक असे तीन कामे प्रस्तावित केली होती. परंतु दोन्ही विभागाला वर्षभरात एकही काम सुरू करता आले नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेसाठी दोन्ही विभाग नापास ठरल्याचे दिसून येते.