तपासणीच्या तुलनेत १२ टक्के कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 05:00 AM2020-12-18T05:00:00+5:302020-12-18T05:00:37+5:30
भंडारा जिल्ह्यात लाॅकडाऊनच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या अगदी नगण्य होती. मार्च महिन्यात आठ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात एकही व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आला नाही. एप्रिल महिन्यात १८६ व्यक्तींची तपासणी केली असता २७ एप्रिल रोजी भंडारा तालुक्यातील गराडा येथील महिला पाॅझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. मे महिन्यात १५१५ व्यक्तींची तपासणी केली असता ३० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात आतापर्यंत ९७ हजार ९९७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यात ११ हजार ७८१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत १२ टक्के व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले तर रुग्ण बरे होण्याचा दर ९२.६८ टक्के आहे.
भंडारा जिल्ह्यात लाॅकडाऊनच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या अगदी नगण्य होती. मार्च महिन्यात आठ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात एकही व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आला नाही. एप्रिल महिन्यात १८६ व्यक्तींची तपासणी केली असता २७ एप्रिल रोजी भंडारा तालुक्यातील गराडा येथील महिला पाॅझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. मे महिन्यात १५१५ व्यक्तींची तपासणी केली असता ३० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. जून महिन्यात २८०० पैकी ५५ व्यक्ती पाॅझिटिव्ह, जुलै महिन्यात ३९८९ पैकी १६९, ऑगस्ट महिन्यात ८०३२ पैकी १०३३, सप्टेंबर महिन्यात २८ हजार ९३ पैकी ४ हजार १४९, ऑक्टोबर मध्ये २४ हजार ३८४ पैकी ३ हजार ८२, नोव्हेंबर महिन्यात १९ हजार ३५५ व्यक्तींपैकी २२५१ आणि १७ डिसेंबर पर्यंत ९६३५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यात १०११ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आटीपीसीआर अंतर्गत १९ हजार २८० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात २८२४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. ७८ हजार ४३३ व्यक्तींची ॲन्टीजेन चाचणी करण्यात आली असता त्यात ८ हजार ८३५ आणि टीआरयुएनएटी अंतर्गत २८४ व्यक्तींची चाचणी केली असता १२२ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आलेत. जिल्ह्यात कोरोनारुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
गुरुवारी ६० पाॅझिटिव्ह ४२ कोरोनामुक्त
भंडारा जिल्ह्यात गुरुवारी ६० व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला तर ४२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. गुरुवारी ४९७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असता त्यात ६० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यामध्ये भंडारा २६, तुमसर ११, मोहाडी ४, पवनी १, लाखनी १३, साकोली ५ रुग्णांचा समावेश आहे. लाखांदूर तालुक्यातील गुरुवारी एकही रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आला नाही. भंडारा तालुक्यातील एका ५९ वर्षीय महिलेचा नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाने मृत्यू झाला. आता मृतांची संख्या २७८ झाली आहे.