१२ कुटुंबीयांना घरे सोडण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2016 12:24 AM2016-06-25T00:24:47+5:302016-06-25T00:24:47+5:30
वैनगंगा नदी काठ व घरांचे अंतर केवळ एका फुटापेक्षाही कमी आहे. भूस्खलन होऊन मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे.
तहसीलदारांचे निर्देश : पावसाळ्यात कुठे राहायचे, ग्रामस्थांचा सवाल
तुमसर : वैनगंगा नदी काठ व घरांचे अंतर केवळ एका फुटापेक्षाही कमी आहे. भूस्खलन होऊन मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरु झाल्याने या घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तुमसर तहसीलदारांनी १२ कुटुंबांना घरे सोडण्याचे निर्देश दिले आहे. दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांनी कुठे जावे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वैनगंगा नदी काठावर रेंगेपार येथे १२ घरे अगदी नदी पात्रात समावेश होण्याइतपत भयानक स्थिती येऊन ठेवली आहे. सन २००७ पासून या कुटुंबाने घरे बांधून देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. परंतु हेतुपुरस्पर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नदी काठापर्यंत ही घरे येऊन टेकली आहेत, तरी शासनाने नियोजन केले नाही. शासनाने या कुटूंबाना गावाशेजारी भूखंड दिले, परंतु दारिद्र्यरेषेखालील जिवन जगणाऱ्या कुटुंबाजवळ पैसा नाही. घरे कशी बांधावी असा प्रश्न या कुटुंबांना पडला आहे.
१६ जून रोजी तुमसरचे तहसीलदारांनी रेंगेपार येथील नैतराम दमाहे, कंटीराम नागपूरे, हंसराज माहुले, रामभाऊ नागपूरे, गुलाब कावळे, ब्रिजलाल मोरांडे, बाबु मोरांडे, आनंदराव सोनवाने, अशोक उके, अंबर शेंडे, कला शेंडे, इंजीनबाई भुरे यांना पत्राद्वारे घरे सोडण्याचे निर्देश दिले आहे. सन २००७ मध्ये मोठे तीव्र आंदोलन येथे ग्रामस्थांनी केले होते. रास्ता रोको, जलसमाधी घेण्याचा इशारा शासनाला दिला होता, परंतु काहीच हालचाली झाल्या नाहीत. या घरासमोरुन डांबरीकरणाचा रस्ता जातो, बाजूला जि. प. ची शाळा आहे. त्यामुळे त्यांनाही मोठा धोका आहे.
रेंगेपार येथे वैनगंगेचे विस्तृत पात्र आहे. दरवर्शी नदी गावाच्या दिशेने झपाट्याने येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेती नदी पात्रात गिळंकृत झाली आहे. लोकप्रतिनिधीनी आतापर्यंत केवळ आश्वासने दिली. येथे प्रत्यक्ष जीव जाण्याची पाळी आली तरी काहीच कारवाई झाली नाही. तहसिलदारांनी केवळ आपले कर्तव्य पार पाडले. लोकप्रतिनिधी येथे आपले कर्तव्य केव्हा पार पाडतील असा प्रश्न ग्रामस्थानी विचारला आहे. (तालुका प्रतिनिधी)