अभियंत्याला 12 लाख 69 हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 05:00 AM2022-07-06T05:00:00+5:302022-07-06T05:00:11+5:30
माझ्याकडे दोन लाख पाऊंडचा चेक असल्याने विमानतळ इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मला पकडले आहे. नियमानुसार पैसे जास्त असल्याने मनी लाँड्रिंगची केस होईल. चेक क्लिअर करण्यासाठी मला पैशाची गरज आहे, असे सांगितले. त्याचवेळी त्याने विमानतळ इमिग्रेशन ऑफिसर सुमन विवेक, विदेशी चलन बदल अधिकारी तन्वी खुराणा, रॉयल बँक ऑफ स्कॉटलँडचे व्यवस्थापक संतोष मारीसन आणि मारिया टेरेसा यांच्याशी वेगवेगळ्या फोनवर बोलणे करून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असलेल्या काळातील ओळखीचा दाखला देत ओमानमध्ये मोठ्या पदावर असलेल्या एका अभियंत्याला मित्राने १२ लाख ६९ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. दिल्ली विमानतळावर आपल्याला मनी लाँड्रिंग केसमध्ये अटक होईल, अशी बतावणी करून दोन दिवसांत ऑनलाइन रक्कम उकळली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अभियंत्याच्या वडिलाने भंडारा ठाण्यात धाव घेतली. त्यावरून पोलिसांनी दिल्ली येथील पाचजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
राजेशकुमार सिंग (४२) असे फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव असून सध्या ते ओमान येथे एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. काही महिन्यापूर्वी त्यांना एक फोन आला. अनिकेत गुप्ते असे नाव सांगितले. आपण नागपूर येथे १९९९ च्या बॅचमध्ये पॉलिटेक्निकला शिकत होताे, असे त्यांनी सांगितले. शिकतानाच्या आठवणी सांगितल्याने राजेशकुमारचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर त्यांच्यात संपर्क वाढला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री पुन्हा सुरू झाली आणि यातूनच भामट्यांनी गंडा घातला.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेची बतावणी
- अनिकेत गुप्तेचा २४ जून रोजी राजेशकुमार फोन आला. मी दिल्ली विमानतळावर आलो आहे. माझ्याकडे दोन लाख पाऊंडचा चेक असल्याने विमानतळ इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मला पकडले आहे. नियमानुसार पैसे जास्त असल्याने मनी लाँड्रिंगची केस होईल. चेक क्लिअर करण्यासाठी मला पैशाची गरज आहे, असे सांगितले. त्याचवेळी त्याने विमानतळ इमिग्रेशन ऑफिसर सुमन विवेक, विदेशी चलन बदल अधिकारी तन्वी खुराणा, रॉयल बँक ऑफ स्कॉटलँडचे व्यवस्थापक संतोष मारीसन आणि मारिया टेरेसा यांच्याशी वेगवेगळ्या फोनवर बोलणे करून दिले. त्यांनी तुम्ही पैसे दिल्यानंतर आम्ही अनिकेतला सोडून देऊ, असे सांगितले.
दिल्लीच्या भामट्यांवर गुन्हा
- भंडारा पोलिसांनी अनिकेत गुप्ते (३३), सुमन विवेक (३१), तन्वी खुराना (४०), संतोष मानिसन (३८), मारिया टेरेसा (३५, सर्व रा. दिल्ली) यांच्याविरुद्ध भादंवि ४२०, ४०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे करीत आहेत.
स्वत:सह आईच्या खात्यातूनही पाठविले पैसे
अनिकेतच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राजेशकुमारने भंडारा येथील एक्सिस बँकेच्या खात्यातून इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून २४ व २५ जून रोजी तीन लाख ५९ हजार, त्यानंतर विविध खात्यांतून १० लाख ५४ हजार रुपये अनिकेतने सांगितलेल्या खात्यात वळते केले. त्यानंतरही पुन्हा पैशाची मागणी होऊ लागली. त्यामुळे आई प्रभावती सिंग यांच्या भंडारा येथील ॲक्सिस बँकेच्या खात्यातून २७ जून रोजी दोन लाख १५ हजार रुपयांचे आरटीजीएस केले. एकूण १२ लाख ६९ हजार रुपये खात्यात पाठविल्यानंतरही पुन्हा सात लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा राजेशकुमारला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. हा प्रकार त्यांनी आपल्या वडिलांना सांगितला. अखेर सोमवारी सायंकाळी वडिलांनी भंडारा पोलीस ठाणे गाठले व फसवणुकीची तक्रार दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने फसवणूक होण्याची भंडारा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी.