करडीत २१ पैकी १२ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:00 AM2020-02-15T06:00:00+5:302020-02-15T06:00:46+5:30
जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय वर्ग ५ ते १२ पर्यंत करडी, निलज खुर्द, मुंढरी खुर्द, मुंढरी बुज., बोरी, मोहगाव, निलज बुज, मोहगाव, नवेगाव, दवडीपार आदी गावातील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची मोठी पटसंख्या आहे. परंतु कला शाखेत तीन पदांपैकी दोन पदे रिक्त, तर एक पद भरलेला आहे. विज्ञान शाखासाठी एकही कायमस्वरुपी शिक्षक नाही. कंत्राटी शिक्षकांवर विज्ञान शाखा चालविली जात आहे.
युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात रिक्त पदांमुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. शाळेत एकुण २१ मंजूर पदे असतांना केवळ नऊ पदे भरलेली आहेत. १२ पदे रिक्त असल्याने शाळा चालवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य निलीमा इलमे यांनी या संबंधाने शिक्षकांची अनेकदा मागणी केली. परंतु शिक्षकांची कमतरता असल्याचे कारण नेहमी सांगितले जात असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर निभवून न्यावे लागत आहे.
जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय वर्ग ५ ते १२ पर्यंत करडी, निलज खुर्द, मुंढरी खुर्द, मुंढरी बुज., बोरी, मोहगाव, निलज बुज, मोहगाव, नवेगाव, दवडीपार आदी गावातील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची मोठी पटसंख्या आहे. परंतु कला शाखेत तीन पदांपैकी दोन पदे रिक्त, तर एक पद भरलेला आहे. विज्ञान शाखासाठी एकही कायमस्वरुपी शिक्षक नाही. कंत्राटी शिक्षकांवर विज्ञान शाखा चालविली जात आहे.
वर्ग ९ ते १० साठी मंजूर पदांची संख्या पाच असून दोन पदे भरलेली असून तीन पदे रिक्त आहेत. वर्ग ५ ते ८ पर्यंत सात पदे असतांना केवळ दोन पदे भरलेली आहेत, तर पाच पदे रिक्त आहेत. कनिष्ठ लिपीकांचे दोन पदे मंजूर असतांना १ पद भरलेले आहे परिचरांच्या मंजूर चार पदांपैकी तीन पदे भरलेली असून एक पद रिक्त आहे. असे एकुण मंजूर २१ पदांपैकी १२ पदे रिक्त आहेत तर फक्त ९ पदे भरलेली आहेत. कायमस्वरुपी शिक्षक नसल्याने शाळेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
विज्ञान शाखेला २० टक्के अनुदान
तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे यांच्या कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षी त्यांनी करडी महाविद्यालयात विज्ञान शाखा विना अनुदानावर सुरु केली होती. मात्र, त्यावेळी शिक्षकांची कमतरता असल्याचे सांगत जिल्हा परिषदेने कायमस्वरुपी शिक्षक देण्यास नकार दिला होता. तेव्हापासून विज्ञान शाखा कंत्राटी शिक्षकांच्या भरवश्यावर चालविली जात आहे. यावर्षी विज्ञान शाखेला २० टक्के अनुदान प्राप्त झाल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका जे. एम. अजवर यांनी दिली आहे.
पालोरा शाळेत शिक्षकांची सहा पदे रिक्त
जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पालोरा येथे सुध्दा वर्ग ५ ते ८ पर्यंत तीन पदे रिक्त आहेत. वर्ग ९ ते १० पर्यंत एक पद, तर कनिष्ठ कला महाविद्यालयात व्याख्याताची एक जागा रिक्त आहे. मुख्याध्यापकाचे पद सुध्दा रिक्त असल्याने कामाचा ताण वाढला आहे. शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या चौरागडे यांनी केली आहे.