आमदार निधीतून १२ अद्ययावत रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:37 AM2021-05-06T04:37:11+5:302021-05-06T04:37:11+5:30
०५ लोक ०७ के भंडारा : कोरोनाच्या संकटाचा सक्षमपणे सामना करता यावा, यासाठी स्थानिक विकास निधीतून आमदार नरेंद्र भोंडेकर ...
०५ लोक ०७ के
भंडारा : कोरोनाच्या संकटाचा सक्षमपणे सामना करता यावा, यासाठी स्थानिक विकास निधीतून आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी १ कोटी २० लक्ष रु. किमतीच्या १२ अद्ययावत रुग्णवाहिका दिल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत दिली.
कोरोनाचे संकट वाढतच आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी येणाऱ्या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असली पाहिजे, असे मत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय पवनी येथे अद्ययावत सोयी-सुविधांनी उपलब्ध २ कार्डियाक ॲम्ब्युलन्स तर ग्रामीण रुग्णालय पवनी, प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी, धारगाव, पहेला, शहापूर, मोहदुरा, कोंढा, आसगाव, सावरला, भुयार अशा १० ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या रुग्णवाहिका आमदार निधीतून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नरेंद्र भोंडेकर यांनी घेतला.
भंडारा विधानसभा क्षेत्रातील रुग्णांना अन्यत्र कुठेही भटकावे लागू नये, तत्काळ बेड उपलब्ध व्हावेत यासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ५०० बेडची व्यवस्था करण्याचे निर्देश आमदार महोदयांनी दिले. यामध्ये आईसीयू बेडची संख्या ३० वरून १५० करण्यात यावी. ऑक्सिजन बेड १२५ वरून २५० करण्यात यावेत. जनरल बेडची संख्या ४० वरून १०० करण्यात यावी. पवनी उपजिल्हा रुग्णालयात १०० ऑक्सिजन बेड आणि १०० जनरल बेडची व्यवस्था करण्यात यावी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये ३०० ऑक्सिजन बेड, १५० आयसीयू तर १५० जनरल बेड वाढविण्याच्या सूचना भोंडेकर यांनी दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आरोग्य आढावा बैठकीत जिल्हाधिकारी संदीप कदम, उपविभागीय अधिकारी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके, निवासी शल्य चिकित्सक डॉ. डोकरीमारे आदी उपस्थित होते.
बॉक्स
दरानुसार आकारणी करा
खाजगी रुग्णालयांमध्ये आयसीयू ९०००, ऑक्सिजन ७५०० व जनरल बेडकरिता ४००० अशी शासकीय नियमानुसारच बिलाची आकारणी करण्यात यावी. याचे नियंत्रण जिल्हा प्रशासनाने काटेकोरपणे करावे, अशी सूचना आ. भोंडेकर यांनी दिली.