भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, वीज कोसळून 12 वर्षीय चिमुकला ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 05:45 PM2021-12-28T17:45:11+5:302021-12-28T18:28:28+5:30
तालुक्यातील धुसाळा शेतशिवारात आज दुपारी ३:४५ ची वाजता वीज कोसळल्याने चिमुकल्यास आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्यात गारांसह पाऊस बरसला आहे
भंडारा : जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. अचानक वातावरणात बदल झाल्याने गारपीट होऊन पाऊस पडला आहे. तत्पूर्वी मोहाडी तालुक्यातील नवेगाव धुसाळा शिवारात वीज कोसळून 12 वर्षीय बालक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नयन परमेश्वर पुंडे असे मृत बालकाचे नाव असून नयन हा आजोबासोबत म्हशी चराईसाठी गेला होता.
तालुक्यातील धुसाळा शेतशिवारात आज दुपारी ३:४५ ची वाजता वीज कोसळल्याने चिमुकल्यास आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्यात गारांसह पाऊस बरसला आहे. त्यामुळे रब्बीसह, भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. अगोदरच, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर, आता पुन्हा अवकाळी पाऊस झाला असून मोठ्या गाराही पडल्या आहेत. गारांचे फोटो सोशल मीडियात शेअर करण्यात आले आहेत.